शहरातील वणी नागरी सहकारी पतसंस्था आरोप प्रत्यारोपांनी गाजू लागली आहे. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांनी पतसंस्थेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. महादेव खाडे यांनी केला आहे. एवढेच नाही तर या पतसंस्थेचे उपाध्यक्ष दौलत वाघमारे व सचिव गजानन आक्केवार यांनी आपले भ्रष्ट व्यवहार उघड होऊ नये म्हणून दीपक दिकुंडवार यांची पाठराखण केल्याचा खुला आरोपही प्रा. खाडे यांनी केला आहे. विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केशव नागरी सहकारी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविषयी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. पण केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत खोंड यांनी प्रा. खाडे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. चंद्रकांत खोंड यांनी प्रसार माध्यमांकरिता प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. प्रा. खाडे यांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराला कंटाळूनच संचालक मंडळाने त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित केला होता, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. प्रा. खाडे हे सूडबुद्धीने संस्थेची बदनामी करून संस्था बंद पाडण्याचे कटकारस्थान करीत आहे. पतसंस्थेसंदर्भात प्रसार माध्यमांच्या माध्यमातून हेतुपुरस्सरपणे खोटी माहिती पसरवून ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न प्रा. खाडे यांनी चालविले असल्याचेही पतसंस्थेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रा. महादेव खाडे हे केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असतांना त्यांनी २०१८ मध्ये अद्ययावत प्रणाली (एमआयएस) सुरु केली. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली, व एका क्लिकवर सर्व व्यवहारांची अपडेट मिळू लागली. सन २०१७-२०१८ च्या अंकेक्षण अहवालानुसार ( सामान्य शेरे व सूचना) पतसंस्थेतील राखीव निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुंतवावा अशी सूचना आली. त्यानुसार पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. खाडे यांनी २०१७-२०१८ चा पतसंस्थेतील १४५ लाख रुपयांचा वैधानिक निधी सीईओ दीपक दिकुंडवार यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा करण्यास सांगितले. पण दीपक दिकुंडवार यांनी निधी जमा केला नाही. २०१८ मध्ये प्रा. खाडे यांनी कोर बँकिंगचा प्रस्ताव मांडला. पण त्यालाही दिकुंडवार यांनी विरोध दर्शविला. कोर बँकिंग व एमआयएस प्रणालीमुळे दीपक दिकुंडवार व त्यांचे पाठीराखे दौलत वाघमारे व गजानन आक्केवार यांचे भ्रष्ट व्यवहार उघड झाले असते. आणि म्हणूनच त्यांनी अन्य संचालकांची दिशाभूल करून प्रा. खाडे यांच्या विरुद्ध २०१९ मध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यांचे पतसंस्थेतील सभासदत्व रद्द करण्यात आले. पण शेवटी विभागीय सहाय्यक निबंधकांनी न्याय केला, व २६ एप्रिल २०२३ ला त्यांचे सभासदत्व कायम केले.
प्रा. महादेव खाडे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक नियुक्त समिती सदस्य सहाय्यक निबंधक कैलास खटारे यांचा माहितीच्या अधिकारांतर्गत त्यांना २०१९ मध्ये अहवाल मिळाला. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत संस्थेने संपूर्ण राखीव निधी व इतर निधीची गुंतवणूक जिल्हा मध्यवर्ती बँकेत करणे अनिवार्य आहे. वर्ष २०१८-२०१९ च्या टाळेबंद पत्रकानुसार पतसंस्थेचा एकूण निधी २,२७,३३,१७८ एवढा आहे. त्यापैकी १,५८,२८,४४१ वैधानिक निधीची गुंतवणूक केली असून ६९,०४,७३७ ही रक्कम व्यवहारात दाखविली आहे. आणि यातच पूर्ण घोळ आहे. व्यवहारात म्हणजे नेमकी कुठे हा प्रश्न निर्माण होतो. प्रा. खाडे यांच्या निरीक्षणानुसार व्यवहारातला हा निधी संस्थेतीलच त्या अधिकाऱ्याच्या नावे एका अर्बन मल्टीस्टेट सोसायटीमध्ये जमा असल्याचे समोर आले आहे. कैलास खटारे यांच्या २०१८-२०१९ च्या अहवालानुसार पतसंस्थेचा राखीव निधी ७५,६४,३०७ एवढा असून त्यापैकी ३३,५२,१५६ जिल्हा मध्यवर्ती बँकेत तर ४२,१२,१५१ ही रक्कम आयडीबीआय बँकेत जमा आहे. परंतु प्रा. खाडे यांच्याकडे असलेल्या संगणकीय स्टेटमेंटमध्ये १६,८३,८४६ एवढीच जमा रक्कम दर्शविण्यात आली आहे. मग उर्वरित रक्कम गेली तरी कुठे हा प्रश्न उपस्थित करून प्रा. महादेव खाडे यांनी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांच्यावर पतसंस्थेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. ज्या बँक व पतसंस्थेत केशव नागरी पतसंस्थेच्या ठेवी आहेत तेथे दीपक दिकुंडवार यांचे व्यवहार तपासणे गरजेचे असल्याचे प्रा. खाडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत खोंड यांनी केले आरोपांचे खंडन
केशव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत खोंड यांनी प्रा. महादेव खाडे यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात प्रा. खाडे हे आकसापोटी पतसंस्थेवर खोटे आरोप करीत असल्याचे म्हटले आहे. प्रा. खाडे यांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. तेंव्हा पासून प्रा. खाडे हे "मी नाही तर पतसंस्था नाही" ही सूडभावना ठेऊन पतसंस्थेविषयी खोटी माहिती पसरवत आहे. ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण करून कर्जदारांना कर्ज न भरण्याचा सल्ला देत आहेत. पतसंस्था बंद पडावी या हेतूने ते पतसंस्थेची नाहक बदनामी करीत आहे. त्यांच्या या खोट्या अफवा पसरविण्यामुळे पतसंस्थेचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. त्यांनी कोणतेही पुरावे नसतांना केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी होऊन अहवालही प्राप्त झाले आहे. त्यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचा व पतसंस्थेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. तसेच २६ एप्रिल २०२३ रोजी विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी दिलेल्या आदेशात पतसंस्थेवर कोणत्याही प्रकारे ताशेरे ओढले नाही. त्यात केवळ २० वर्ष इतकी कडक शिक्षा देता येत नाही, एवढेच नमूद केले आहे. विभागीय सहनिबंधक यांचा आदेश केवळ तांत्रिक बाबींवर असून त्यांचे सभासदत्व कायम केल्याचा कुठलाही आदेश नाही. विभागीय सहनिबंधक अमरावती यांच्या आदेशाविरोधात सक्षम न्यायालयात अपील केल्याचेही चंद्रकांत खोंड यांनी म्हटले आहे. केशव नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा प्रा. खाडे यांनी आरोप आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. परंतु ही याचिका तथ्यहीन व त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा निष्कर्ष नोंदवित न्यायालयाने आरोपासंदर्भात कुठलेही पुरावे नसल्याने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे ते आता संस्थेची नाहक बदनामी करीत फिरत असल्याचे स्पष्टीकरण केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत खोंड यांनी प्रसार माध्यमांना जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिले आहे.
No comments: