Latest News

Latest News
Loading...

पालेभाज्यांचे भाव भिडले गगनाला, किलोचा भाव आला पावाला



प्रशांत चंदनखेडे वणी 

पावसाळा सुरु होताच भाजीपाला महागला आहे. भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. भाजीपाल्याच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. भाजीपाल्याच्या किमतीत अचानक वाढ झाल्याने महागाईचा दर वाढला आहे. भाजीपाल्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असल्याने त्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. पालेभाज्यांचे भाव कडाडल्याने मजुदार वर्गाचं उदरनिर्वाहाचं नियोजनच बिघडलं आहे. पावसामुळे भाजीपाला सडण्याचा धोका राहत असल्याने भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव प्रचंड वाढले आहेत.

भाजीच्या फोडणीचा मुख्य अंग असलेला टमाटर महागल्याने भाजीची चव बिघडली आहे. टमाटरचे भाव १०० रुपये किलोच्याही पार गेले आहेत. त्यामुळे भाजी फोडणी देतांना निम्म्यापेक्षाही कमी टमाटर टाकण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. १ महिन्या आधी २५ ते ३० रुपये किलो असलेला टमाटर आता शंभरी पार झाला आहे. तसेच चटणीत टमाटरचा साथ देणारी मिरचीही टमाटर सारखीच भावात बहरली आहे. जिभेला झोंबनारी मिरची आता अंगावर काटे आणू लागली आहे. टोमॅटो व मिरचीला आता किलोचे भाव पावाला आले आहेत. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्याही १०० रुपये किलोच्या वर गेल्या आहेत. कधी जुडी प्रमाणे मिळणाऱ्या पालेभाज्या आता पाव किलोने घ्याव्या लागत आहे. लसणही शंभरी पार झालं आहे. उन्हाळ्यात १०० रुपयाला चार किलो मिळणारा लसूण आता १०० रुपयाला एक किलोही मिळत नाही. फुल कोबीचेही भाव वाढल्याने अनेकांनी तिचा नाद सोडणं पसंद केलं आहे. सध्या आलू वांगेच सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराचे साथीदार बनून आहेत. कांद्याने अजून वांदा केला नसल्याने नागरिकांचे फावले आहे. पण अन्य भाजीपाला महागल्याने नागरिकांचं पुरतं गणित बिघडलं आहे. काटकसर करतांना गृहिणीही चिंतेत आल्या आहेत. अचानक भाजीपाल्याच्या किमती भडकल्याने सर्वसामान्य कुटुंबाचं उदर्निवाहाचं नियोजन बिघडलं आहे. 

No comments:

Powered by Blogger.