Latest News

Latest News
Loading...

सूडभावनेने पेटलेल्या महादेव खाडे यांनी केशव नागरी पतसंस्थेला बदनाम करण्याचा बांधला चंग


प्रशांत चंदनखेडे वणी 

केशव नागरी सहकारी पतसंस्थेवर गैर व्यवहार व भ्रष्टाचाराचे होत असलेले आरोप हे एका द्वेषाने पेटलेल्या व्यक्तीचे षडयंत्र असून पतसंस्थेतील सभासदत्व गोठविण्यात आल्याने उद्विग्न भावनेतून संस्थेला बदनाम करण्याकरिता रचण्यात आलेले हे कटकारस्थान आहे. पतसंस्थेची गुंतवणूक व व्यवहार पूर्णतः पारदर्शी असून ग्राहकांच्या ठेवीही सुरक्षित आहे. पतसंस्थेत कोणत्याही प्रकारचा अपहार झाला नसून हा एका व्यक्तीने आकसापोटी केलेला बिनबुडाचा आरोप आहे. पतसंस्थेत कुठल्याही प्रकाराचा गैर व्यवहार किंवा भ्रष्टचार झालेला नसतांनाही पतसंस्थेला नाहक बदनाम करणाऱ्या त्या व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्टीकरण केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत दिले. पतसंस्थेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संचालकांनी पतसंस्थेवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. त्यांनी आरोप करणाऱ्या व्यक्तीने सादर केलेल्या पुराव्यांचेच बिंग फोडले आहे. पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा व्यक्तीच भ्रष्ठाचारी असून त्याने बनावट व खोटे दस्तऐवज तयार करून सर्वांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचाही आरोप संचालकांनी केला आहे.  

केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. महादेव खाडे हे पतसंस्थेत भ्रष्टाचार झाल्याची आगपाखड करीत आहे. पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांनी पतसंस्थेच्या रक्कमेत अपहार केला असून पतसंस्थेच्या उपाध्यक्ष व सचिवांनी त्यांची पाठराखण केल्याचा आरोप प्रा. महादेव खाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी पतसंस्थेची व्यवहारात असलेली रक्कम दीपक दिकुंडवार यांच्या वयक्तिक खात्यावर जमा असल्याचाही आरोप केला होता. त्यावर स्पष्टीकरण देतांना पतसंस्थेच्या संचालकांनी म्हटले की, त्यांनी केलेले आरोप हे पूर्णतः बिनबुडाचे आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पतसंस्थेच्या संचालक मंडळाने मार्च २०१९ मध्ये त्यांच्याविरुद्ध जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला, व तो पारित देखील झाला. त्यावेळी त्यांचं अध्यक्षपद तर गेलंच पण त्यांचं सभासदत्वही रद्द करण्यात आलं. त्यामुळे ते पतसंस्थेवर सूड उगारत आहेत. सूड भावनेतून पतसंस्थेला बदनाम करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. पतसंस्थेवर खोटे आरोप करून प्रामाणिक वाटचाल करणाऱ्या पतसंस्थेला बंद पाडण्याचे मनसुबे त्यांनी आखले आहे. खोटे बँक स्टेटमेंट व पतसंस्थेच्या कागदपत्रांमध्ये खोडतोड करून त्यांनी खाते व रक्कमांमध्ये हेरफेर केली आहे. पतसंस्थेत भ्रष्टाचार केल्याचे बनावट व बोगस पुरावे पत्रकार परिषदेत सादर करून त्यांनी सूडबुद्धीचा परिचय दिला असल्याचेही संचालकांनी म्हटले आहे. 

प्रा. महादेव खाडे यांनी पतसंस्थेचा १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा न केल्याचा आरोप केला आहे. परंतु गुंतवणूक कुठे करायची हा निर्णय संचालक मंडळाचा असतो. प्रा. खाडे हे अध्यक्ष असतांना त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत निधी जमा करण्याचा कोणताही ठराव घेतला नाही. त्यामुळे आधी झालेल्या संचालक मंडळाच्या ठरावानुसार निधी व्याजदर जास्त असलेल्या बँकेतच गुंतविला जात होता. ते स्वतः अध्यक्ष असतांना त्यांनी निधीची गुंतवणूक करण्यासंदर्भात कोणताही ठराव घेतला नाही, आणि आता तेच गुंतवणुकीचा मुद्दा उपस्थित करून त्याला वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. ते अध्यक्ष असतांना त्यांनी निधीची गुंतवणूक करण्याबाबत संचालक मंडळाचा ठराव घेतला नाही, मग याला दोषी कोण हा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रा. खाडे यांनी व्यवहारातील रक्कम सीईओ दीपक दिकुंडवार यांच्या वयक्तिक खात्यावर जमा असल्याचा आरोप देखील केला होता. तो ही आरोप त्यांनी सूडबुद्धीने केला असल्याचे संचालकांनी स्पष्ट केले. त्यांनी ज्या मल्टीस्टेट सोसायटीत दीपक दिकुंडवार यांचे अकाउंट असल्याचा आरोप केला. त्या सोसायटीत त्यांचं कुठलंही अकाउंट नसल्याचं पत्र सोसायटीनं दिलं आहे. प्रा. खाडे यांनी सोसायटीचं बनावट स्टेटमेंट तयार केल्याचा खुलासच संचालकांनी यावेळी केला. त्या मल्टीस्टेट सोसायटीत केशव नागरी पतसंस्थेच्या नावानेच निधी जमा असल्याचे संचालकांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. प्रा.खाडे यांनी भ्रष्टाचाराची रक्कमही वेगवेगळी सांगितली आहे. यावरून त्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं दिसून येते आहे. प्रा. खाडे यांनी पतसंस्थेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक यवतमाळ, विभागीय सहनिबंधक अमरावती, पोलिस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार संबधित अधिकाऱ्यांनी चौकशी देखील केली. पण चौकशीत कुठलाही गैरप्रकार आढळून न आल्याने त्यांच्या सर्व तक्रारी तथ्यहीन ठरल्या. तसेच पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात देखील पतसंस्थेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. न्यायालयात त्यांच्या बाजूने निकाल लागला असल्याचे ते सांगत आहेत. पण त्यांच्या बाजूने निकाल लागला नसल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी देखील पतसंस्थेच्या व्यवहारावर कोणताही आक्षेप घेतला नाही, तर तांत्रिक बाबींवर स्पष्टीकरण मागितले आहे. प्रा. खाडे यांना सभासदत्व बहाल केल्याचा कुठलाही आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिलेला नाही. प्रा. महादेव खाडे हे खोट्या अफवा पसरवून पतसंस्थेची बदनामी करीत असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव अनिल आक्केवार, संचालक विनायक कोंडावार, प्रा. गजानन अघडते व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

सीईओ दीपक दिकुंडवार यांचा आरोपांबाबत खुलासा   

मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दिकुंडवार यांच्यावर प्रा. खाडे यांनी थेट भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांच्यावर वयक्तिक आरोप करण्यात आल्याने त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देतांना म्हटले की, मी एक पतसंस्थेतील कर्मचारी आहे. माझ्यावर प्रा. खाडे यांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याकरिता संचालकांना प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. माझ्या सारख्या कर्मचाऱ्याने संचालकांना प्रवृत्त करणे शक्य तरी आहे काय, याचा तरी त्यांनी विचार करायला हवा. त्यांनी १ कोटी ४५ लाखांचा वैधानिक निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा न केल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. पण निधी कुठे गुंतवायचा हा निर्णय सर्वस्वी संचालक मंडळ घेते. प्रभाकर येनगंट्टीवर केशव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष असतांना त्यावेळी संचालक मंडळाने निधी व्याजदर जास्त असलेल्या पतसंस्था व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा करण्याचा ठराव घेतला होता. परंतु प्रा. खाडे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आधीच्या संचालक मंडळाच्या ठरावावर कुठलाही आक्षेप घेतला नाही की, जिल्हा मध्यवर्ती बँकेत निधी गुंतविण्याबाबत नवीन ठराव घेतला नाही. मग यात दोष कुणाचा. चंद्रकांत खोंड हे पतसंस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी संचालक मंडळाचा ठराव घेऊन जानेवारी २०२० मध्ये पतसंस्थेचा वैधानिक निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुंतविला. प्रा. खाडे यांनी पतसंस्थेत भ्रष्टाचार झाल्याच्या वेगवेगळ्या विभागाकडे तक्रारी केल्या. पण त्यात काहीच निष्पन्न झालं नाही. पतसंस्थेच्या व्यवहाराचे दरवर्षी लेखा परीक्षणही झाले. पण भ्रष्टाचार झाल्याचा पतसंस्थेवर कुणीही ठपका ठेवला नाही. मग या सर्व विभागाला मी मॅनेज केले असे तर त्यांना वाटत नसावे. त्यांनी पतसंस्थेची व्यवहारातील रक्कम माझ्या नावे जमा असल्याचा जावई शोध लावला. त्याचाही खुलासा आम्ही या पत्रकार परिषदेतून केला आहे. माझं पतसंस्थेचा निधी गुंतविलेल्या कोणत्याही बँकेत वयक्तिक अकाउंट नाही. त्यामुळे माझ्या वयक्तिक खात्यावर लाखो रुपयांचा निधी जमा असल्याचा आरोप पूर्णतः खोडसाळ आहे. प्रा. खाडे हे आकसापोटी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून पतसंस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचे दिलेले पुरावेही पूर्णतः बनावट असून ते निरर्थक आरोप करून पतसंस्थेविषयी ठेवीदारांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे.     

No comments:

Powered by Blogger.