आलिशान कारमधून होणारी सुगंधित तंबाखूची तस्करी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रोखली, ८ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
सुगंधित तंबाखूचा साठा व विक्री करण्यावर शासनाने प्रतिबंध लावला असतांनाही काही अवैध विक्रेते चोरट्या मार्गाने सुगंधित तंबाखूची तस्करी करून त्याची अवैधरित्या विक्री करीत आहेत. प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या तस्करी व विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अनेक हात या धंद्यात गुंतले आहेत. एका आलिशान कारमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्कराच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. शहरात अवैध विक्री करिता सुगंधित तंबाखूची खेप घेऊन येणाऱ्या तस्कराला पोलिसांनी सापळा रचून आलिशान कारसह ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही काल २५ जुलैला रात्री दरम्यान शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील आभई फाटा येथे करण्यात आली. सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केलेली ही मागील १० दिवसातील दुसरी मोठी कार्यवाही आहे.
स्थानिक गुन्हे शाखा वणी, पांढरकवडा विभागाचे पथक वणी येथे अवैध धंद्यांची माहिती मिळविण्याकरिता परिसरात गस्त घालत असतांना त्यांना प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची ठाकोरी बोरी मार्गे शिरपूर येथे वाहतूक होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आभई फाटा येथे सापळा रचून सांगितलेल्या वर्णनाच्या कारवर बारीक लक्ष ठेवले. काही वेळातच त्यांना आर्टिका (MH ३४ AM २५२०) ही कार ठाकोरी बोरी मार्गाने शिरपूरकडे येतांना दिसली. पोलिसांनी ती कार थांबवून कारची झडती घेतली असता कारमध्ये सुगंधित तंबाखूचे वेगवेगळ्या कंपनीचे डब्बे आढळून आले. पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करणारा कार चालक प्रविण अंबादास गोहकार (३९) रा. शास्त्री नगर याला अटक करून सुगंधित तंबाखूचा साठा व मारुती सुझुकी अर्टिका ही कार ताब्यात घेतली. पोलिसांनी या धडक कार्यवाहीत मजा सुगंधित तंबाखूचे २०० ग्राम वजनाचे २४० डब्बे किंमत २ लाख २४ हजार ४०० रुपये, ईगल हुक्का सुगंधित तंबाखूच्या २०० ग्राम वजनाच्या ४० शिश्या किंमत १२ हजार ४०० रुपये, चार मिनार ३३३ सुगंधित तंबाखूचे ३० डब्बे किंमत ५ हजार ५५० रुपये, एक मोबाईल व अर्टिका कार असा एकूण ८ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आलिशान कार मधून सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे यांना दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रविण गोहकार विरुद्ध शिरपूर पोलिस स्टेशनला अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ नुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोहवा सुनिल खंडागडे, पोना सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, चालक नरेश राऊत यांनी केली.
Comments
Post a Comment