जैन ले-आऊट येथील बेपत्ता शिक्षकाचा अद्यापही लागला नाही शोध
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील जैन ले-आऊट येथे वास्तव्यास असलेले शिक्षक घरून बेपत्ता झाल्याची तक्रार २० जुलैला पोलिस स्टेशनला करण्यात आली. परंतु अद्यापही शिक्षकाचा शोध न लागल्याने कुटुंबातील सदस्य कमालीचे चिंतेत आले आहेत. त्यातच बेपत्ता शिक्षकाची मोटरसायकल वर्धा नदीच्या पाटाळा पुलावर आढळून आल्याने कुटुंबीयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभावना म्हणून वर्धा नदी पात्रातही शोध मोहीम राबविली जात आहे. परंतु अद्यापही कुठलीच माहिती समोर न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
जैन ले-आऊट येथील रहिवाशी असलेले व कोरपना तालुक्यातील कोळशी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले अजय लटारी विधाते (३९) हे १९ जुलैला सकाळी ९ वाजता फिरायला जातो म्हणून मोटरसायकलने घरून निघाले. त्यानंतर ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोधाशोध सुरु केला. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने शेवटी त्यांच्या वडिलांनी २० जुलैला पोलिस स्टेशनला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान त्यांची मोटरसायकल वर्धा नदीच्या पाटाळा पुलावर आढळून आल्याने कुटुंबं काळजीत आलं आहे. संभावनेच्या आधारावर वर्धा नदी पात्रातही शोध मोहीम राबविली जात आहे. परंतु बेपत्ता शिक्षकाबद्दल कुठलीच माहिती समोर न आल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे. शिक्षक अजय विधाते यांना घरून बेपत्ता होऊन तीन दिवस झाले असतांनाही त्यांचा अद्यापही शोध लागला नसल्याने कुटुंबियांवर चिंतेचे ढग दाटले आहे. त्यांचा कुटुंबीय व पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे.
Comments
Post a Comment