हिंसाचाराने धुमसत असलेल्या मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ गोवारी (पारडी) येथे निघाला कँडल मार्च
प्रशांत चंदनखेडे वणी
मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. हिंसाचाराची आग धुमसत असतांना ती शांत करण्याकरिता निर्णायक पाऊले उचलली जात नसल्याने मणिपूर येथे अशांतता पसरली आहे. दोन समुदाय एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने मानवी संवेदना हरपून मानवी संघर्ष पेटला आहे. माणूस माणसाच्या जीवावर उठल्याने मणिपूर येथे अराजकता माजली आहे. जातीवादाने पछाडलेला माणूस माणुसकी व बंधुभाव विसरून एकमेकांचा वैरी झाला आहे. गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या दोन्ही समुदायांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमातून जातीयतेची ठिणगी पडली, व हिंसाचाराची आग भडकली. जातीयवादी मानसिकतेतून मनुष्यामध्ये एवढी क्रूरता निर्माण झाली की, निष्पाप महिलांवर अत्याचार करून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा देशातच नाही तर विदेशातूनही निषेध करण्यात येत आहे. महिलांवरील या अत्याचाराच्या घटनेमुळे जनमाणसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महिलांच्या आब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या क्रूरकर्म्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देश विदेशातून होऊ लागली आहे. महिलांवर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आल्याने देशातून तीव्र संताप व्यक्त होत असतांनाच या हैवानी कृत्याचा निषेध म्हणून गोवारी (पारडी) येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा संघटना, महिला बचत गट व गावकऱ्यांनी कँडल मार्च काढला.
काल ३० जुलैला सायंकाळी सात वाजता क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून गावातून हा कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये गावातील महिला, पुरुष, अबाल वृद्धांसह तरुणाई व लहान मुलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. सर्वांनी हातात कँडल घेऊन महिलांवरील अत्याचाराच्या या घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. हा कँडल मार्च गावातील रस्त्यांनी भ्रमण करीत बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर येथे सभा घेऊन या कँडल मार्चची सांगता झाली. यावेळी ग्रा.प. सदस्य राजेंद्र इददे, सुरेखा उईके, अनिल उईके, मोरेश्वर किनाके यांच्यासह गावातील महिला, पुरुष व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


No comments: