प्रशांत चंदनखेडे वणी
कंत्राटदाराला कामाचे बिल काढण्याकरिता लाच मागणाऱ्या नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षकाला यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली. तर तेथे हजर असलेल्या दोन नगर पालिकेच्या अभियंत्यांवर कार्यवाही केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही कार्यवाही आज १ ऑगष्ट ला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास यवतमाळ मार्गावरील गजानन भोजनालय येथे करण्यात आली. कामाचे बिल काढण्याकरिता कंत्राटदाराला झुलवीतांनाच शेवटी लाचेची मागणी करण्यात आल्याने कंत्राटदाराने वैतागून लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे याबाबत तक्रार केली. आज ठरल्याप्रमाणे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पैशाची मागणी करणाऱ्या आरोग्य निरीक्षकाला कंत्राटदाराकडून लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली. त्यावेळी दोन अभियंतेही त्याठिकाणी उपस्थित होते. पाणी पुरवठा अभियंता शुभम तायडे, कंत्राटी अभियंता मयूर मुंडाने व आरोग्य निरीक्षक जय उंटवाल हे तिघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
जवळपास मागील दोन वर्षांपासून नगर पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत आहे. नगर परिषदेत लोकप्रतिनिधीच नसल्याने अधिकारी वर्गाला रान मोकळे झाले आहे. नगर पालिकेच्या भोंगळ कारभाराला जनताही वैतागली आहे. कुणाचं कुणावरही नियंत्रण राहिलं नसल्याने नगर पालिका सतत चर्चेत रहात आहे. मुख्याधिकाऱ्यांचीही बदली झाली असून त्यांच्यावरच सध्या नगर पालिकेचा प्रभार देण्यात आला आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगर पालिकेचा अधिकारीवर्ग अनियंत्रित झाला आहे. त्यांना खुली सूट मिळाल्याने ते संधीचा फायदा उठविण्याच्या प्रयत्नात चांगलेच लालची झाले. त्यांची पैशाची भूक सतत वाढत गेल्याने ते कंत्राटदारांना कॅश करण्याचा प्रयत्न करू लागले. कोणतंही बिल पास करण्याकरिता आधी खिशे गरम करण्याचा फर्मान सोडू लागल्याने कंत्राटदार चांगलेच वैतागले होते. त्यांच्या सतत पैशाची मागणी करण्याच्या त्रासाला कंटाळून अखेर कंत्राटदाराने सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे याबाबत तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाच मागणाऱ्यांवर ट्रॅप लावण्याची योजना आखली.
ठरल्याप्रमाणे आज आरोग्य निरीक्षकाला पैसे देण्याच्या बहाण्याने गजानन भोजनालय येथे बोलाविण्यात आले. त्यावेळी नगर पालिकेचे दोन अभियंतेही तेथे हजर होते. कंत्राटदाराने पैसे देताच तेथे सापळा रचून असलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य निरीक्षकाला लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. त्यावेळी तेथे हजर असलेल्या दोन्ही अभियंत्यांवरही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली. तिघांवरही कार्यवाही करून त्यांना भालर येथील विश्राम गृह येथे पुढील चौकशी करिता नेण्यात आले आहे. पाणी पुरवठा अभियंता शुभम तायडे, कंत्राटी अभियंता मयूर मुंडाने व न.प. आरोग्य निरीक्षक जय उंटवाल यांच्यावर झालेल्या एसीबीच्या कार्यवाहीने शहरात एकच खळबळ माजली आहे. जय उंटवाल यांनी कंत्राटदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली त्यावेळी शुभम तायडे व मयूर मुंडाने हे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे तिघांवरही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

No comments: