Latest News

Latest News
Loading...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

प्रशांत चंदनखेडे वणी 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मादगी बहुउद्देशीय संस्थेच्या विद्यमाने १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या वणी, मारेगाव व झरी या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ६ ऑगष्टला दुपारी १२ वाजता वसंत जिनिंग सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मादगी समाजातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थीवर मात करून शैक्षणिक प्रगती साधली आहे. या समाजातील विद्यार्थ्यांनी हालाकीच्या परिस्थितीतही जिद्दीने शिक्षण घेत १० वी, १२ वी बोर्डाच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलं आहे. या विद्यार्थ्यांचाही गौरव व्हावा या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त विविध शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी नायब तहसीलदार चरणदास कोंडावार, उद्घाटक मोची, मादगी, मादरु, मादिगा महासंघाचे महासचिव सुनिल मिद्दे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे व लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख करमसिंग राजपूत यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर उच्च नायालयाचे अधिवक्ता गजानन अंबलवार, M४ महासंघाचे उपकोषाध्यक्ष मुरलीधर लाटेलवार उपस्थित राहणार आहेत. वणी उपविभागात पहिल्यांदाच भव्य असा हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा मादगी बहुउद्देशीय संस्था व समाजाच्या विद्यमातून आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेचे सचिव सुरज चाटे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व आयोजकांनी केले आहे.    

तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक थोर समाज सुधारक होते. लोककवी, लेखक व दलित साहित्याचे संस्थापक असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (वाळवा) येथे झाला. मांग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने सामाजिक चळवळीला एक नवीन दिशा दिली. त्यांचे साहित्य , लेखन व कविता लोक चळवळीची ऊर्जा निर्माण करणाऱ्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. आंबेडकरवादी विचारसरणीने प्रेरित झालेल्या अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतांना लिहिलेलं गाणं " जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" आजही स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देतं. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, लेखन व काव्यातून समाजातील विषमतेवर घाव घातला. 

No comments:

Powered by Blogger.