Latest News

Latest News
Loading...

डॉ. महेंद्र लोढा यांच्यावर बेजाबदारपणे रुग्ण हाताळल्याचा आरोप, डॉ. लोढा यांनी केले आरोपाचे खंडन, दिला मानवसेवी पदाचा राजीनामा

प्रशांत चंदनखेडे वणी 

गर्भवती असलेली महिला वणी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करिता येत होती. महिला ही तिन व सहा महिन्यांची गार्भवती असतांना ग्रामीण रुग्णालयातील मानवसेवी स्त्री रोग चिकित्सक डॉ. महेंद्र लोढा यांनी तिला खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. डॉ. लोढा यांच्या सल्ल्यानुसार महिलेने त्यांच्याच रुग्णालयात सोनोग्राफी करून घेतली. त्यावेळी डॉक्टरांनी बाळ सुदृढ असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वाढत्या गर्भानुसार सोनोग्राफी केल्यानंतरही विचित्र व विकलांग बाळ जन्माला आले. डॉ. लोढा यांनी दोनही सोनोग्राफीत बाळ ठणठणीत असल्याचे सांगितल्यानंतरही विकलांग बाळ जन्माला आल्याने पती पत्नी व्यथित झाले. त्यांनी डॉ. लोढा यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करीत त्यांच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार देऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. डॉ. लोढा यांनी गर्भवती महिलेवर उपचार करतांना दाखविलेल्या बेजाबदारपणामुळे विकलांग बाळ जन्माला आल्याचा आरोप महिलेच्या पतीने पत्रकार परिषदेतून केला आहे. तर डॉ. लोढा यांनीही पत्रकार परिषद घेऊन या आरोपाचे खंडन केले. तसेच यानंतर ग्रामीण रुग्णालयात मानवसेवी स्त्री रोग चिकित्सक म्हणून काम पाहणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहरातील भगतसिंग चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या नरेंद्र शंकर बुजाडे यांची पत्नी भाग्यश्री ही गर्भवती असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात वेळोवेळी तपासणी करिता यायची. ती तीन महिन्यांची गर्भवती असतांना ग्रामीण रुग्णालयात मानवसेवी स्त्री रोग चिकित्सक म्हणून कर्तव्य बजाविणाऱ्या डॉ. महेंद्र लोढा यांनी नरेंद्र बुजाडे यांना पत्नीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार नरेंद्र बुजाडे यांनी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तिन व सहा महिन्याच्या अंतरात पत्नीची सोनोग्राफी करून घेतली. दोन्ही सोनोग्राफीमध्ये डॉ. लोढा यांनी बाळ सुदृढ असल्याचे सांगितले. परंतु महिलेच्या गर्भधारणेला नऊ महिने पूर्ण होण्याआधीच महिलेची प्रसूती झाली. जन्माला आलेले बाळही विचित्र व विकलांग होते. जन्मताच बळावर शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढावला. बाळ सुदृढ व स्वस्थ असल्याचे डॉ. लोढा यांनी निदान दिल्यानंतरही बाळ विकलांग जन्माला आल्याने बुजाडे पती पत्नी कमालीचे व्यथित झाले. त्यांनी डॉ. लोढा यांना तुमच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यानंतरही विचित्र बाळ जन्माला आल्याचे सांगताच डॉ. लोढा त्यांच्यावरच भडकले व त्यांना अपमानित केल्याचा आरोप नरेंद्र बुजाडे यांनी पत्रकार परिषदेतून केला. डॉ. लोढा यांच्या बेजाबदारपणामुळेच विकलांग बाळ जन्माला आले असून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस स्टेशन व संबंधित विभागांकडेही तक्रारी केल्या असल्याचे यावेळी सांगितले.  

डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आरोपाचे खंडन 

डॉ. महेंद्र लोढा यांनाही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. तसेच त्यांच्यावर समाजमाध्यमातून विविध प्रकारचे आरोप झाल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील मानवसेवी पदाचा राजिनामाही दिला. यानंतर ग्रामीण रुग्णालयात सेवा देणार नसल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. सदर गर्भवती महिलेने योग्य वेळी तपासण्या केल्या नसल्याने हा प्रसंग ओढावल्याचे डॉ. लोढा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. गर्भवती महिलेने माझ्या सल्ल्यानुसार वेळोवेळी तपासण्या केल्या असत्या तर बाळाच्या प्रकृतीबाबत निदान लागले असते. डॉ. लोढा यांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात लेव्हल-१ ची सोनोग्राफी मशीन आहे. या मशीनने साधी सोनोग्राफी केली जाते. महिलेची सोनोग्राफी केली, त्यावेळी २२ आठवड्याचा गर्भ असल्याने महिलेला ३ डी सोनोग्राफी केंद्रावर जाऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. महिलेला रेफर लेटरही दिले. पण नंतर ती महिला माझ्याकडे तपासणी करिता आलीच नसल्याचे डॉ. लोढा यांनी सांगितले. त्यामुळे गर्भातील बाळाचे पूर्ण निदान लागू शकले नाही. माझ्यावर होत असलेले आरोप हे तथ्यहीन असून मी या आरोपाचे पूर्णतः खंडन करतो, असे डॉ. लोढा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील मानवसेवी स्त्री रोग चिकित्सक पदाचाही मी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

No comments:

Powered by Blogger.