प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर बनली असताना वणी वाहतूक उपशाखेच्या पोलिस उपनिरीक्षकांनी शहरात वाहतुकीचे नियम अधिकच कडक करून शहरात हेल्मेटची सक्ती केल्याने त्यांची सध्या गाजत असलेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटाप्रमाणे "मॅडम पण लय भारी" अशी खमंग चर्चा शहरवासीयांमध्ये रंगली आहे.
अनियंत्रित वाहतुकीमुळे शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर नेहमी वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहरवासी कमालीचे वैतागले आहेत. रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे नेहमी वाहतुकीचा जाम लागताना दिसतो. पाणी विक्री करणारी वाहने भर रस्त्यावर उभी करून पाणी विक्री करतांना दिसतात. मालवाहू वाहने व कारही रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याने रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. संजय आत्राम हे वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक असतांना वाहतुक बऱ्यापैकी नियंत्रणात आली होती. ते सतत शहरातील रस्ते व मुख्य मार्गांवर गस्त घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर द्यायचे. त्यांच्या कडक कारवायांमुळे वाहनधारकांमध्ये शिस्त निर्माण होऊन ते नियमांचं पालन करायला लागले होते. त्यांनी वाहतुकीने गजबजलेल्या लालपुलिया परिसरातील वाहतुकीलाही नियम लावून रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहतूकदारांना चांगलेच नियमांचे पाठ गिरविले होते. त्यांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिल्याने वाहनांनी नेहमी घेरून राहणारा हा वणी यवतमाळ मार्ग वाहनांच्या गराड्यातून मुक्त झाला. त्यांनी लावलेल्या नियमांमुळे आता लालपुलिया परिसरात रात्री रस्त्यावर वाहने उभी राहतांना दिसत नाही. संजय आत्राम यांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर नेहमी भर दिला. परंतु आता वाहतुकीच्या समस्येने परत डोके वर काढले आहे. परंतु नव्याने रुजू झालेल्या वाहतूक पोलिस उपनिरीक्षकांनी वाहतुकीची समस्या सोडविण्याकरीता वेगळ्या पद्धतीचा अवलंब करीत दुचाकीस्वारांना शहारतही हेल्मेटचा वापर करण्याची सक्ती केली. त्यामुळे "मॅडम पण लय भारी" अशी खमंग चर्चा शहरवासियांमध्ये रंगली आहे. सध्या बाईपण भारी देवा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट बघण्याकरिता चित्रपट गृहांमध्ये महिलांची चांगलीच गर्दी उसळली आहे. बाईपण भारी याचा प्रत्यय शहरवासीयांना देखील आला आहे. शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आल्याने वाहतूक उपनिरीक्षक शहरात चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे शहरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वणी वाहतूक उपशाखेच्या या निर्णयामुळे शहरवासियांमधून विविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. वाहतूक उपशाखेत काही दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या वाहतूक पोलिस उप- निरीक्षकांनी दुचाकीस्वारांना शहरातील रस्त्यांवरूनही दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करण्याची सक्ती केली. त्यांनी हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर कार्यवाही करणे देखील सुरु केले. नगर पालिका हद्दीतील रस्त्यांवर वाहतूक पोलिसांना तैनात करून हेल्मेट न घातलेल्या दुचाकी चालकांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने दुचाकी चालकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. डोक्यावर हेल्मेट नसल्याने दुचाकी चालकाला चालान दिले जात असल्याने दुचाकी धारकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली. वाहतूक नियंत्रित करण्याकरिता कधी प्रमुख चौकात तैनात नसणारे वाहतूक पोलिस मात्र शहरातील रस्त्यांवर उभे राहून हेल्मेट न घातलेल्यांना प्रामाणिकपणे चालान करतांना दिसले. त्यामुळे वाहतूक पोलिस उपनिरीक्षकांनी लावलेल्या या कडक नियमामुळे शहरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बेशिस्त वाहतुकीलाही असेच नियम लाऊन शहरातील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. शहरात हेल्मेटची सक्ती करून वाहतुकीचे नियम अधिकच कडक करण्यात आल्याने शहरवासीयांमधून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून या निर्णयामुळे "मॅडम पण लय भारी" ही खमंग चर्चा शहरात रंगू लागली आहे.असे असले तरी शहरातील वाहतुकीची समस्या अद्याप सुटलेली नाही. अनियंत्रित वाहतुकीमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीचा जाम लागताना दिसतो. बेशिस्तपणे वाहने चालविली जात असल्याने प्रमुख रस्ते व चौकांमध्ये नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने रहदारीला अडथळे निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. कित्येक दुकानदारांनी आपले साहित्य रस्त्यावर मांडले आहेत. दुकानांचे नामफलकही रस्त्यावर ठेवले जातात. हातगाडी व फेरीवाले रस्त्यावरच उभे राहून व्यवसाय करतात. भाजी विक्रेत्यांनी तर शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी दुकाने थाटली आहे. पाणी विक्री करणारी वाहने रस्त्यावर उभी करून आरामात पाणी विक्री करतांना दिसतात. ऑटो चालकांची रस्त्यावर मनमानी पाहायला मिळते. अनेक दुकाने, बँका, बियरबार, मंगल कार्यालये यांच्याकडे पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने याठिकाणी येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. दीपक चौपाटी मार्गे वाघदरा जाणाऱ्या रस्त्यावर अनेक भंगार व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. या दुकानांमधील स्क्रॅब मटेरियल अगदीच रस्त्याच्या कडेला साठवून ठेवण्यात आलं आहे. रस्त्याच्या कडेलाच गॅस कटरने स्क्रॅब कटिंग केली जाते. रस्त्यावरच वाहने उभी करून स्क्रॅब भरला जातो. त्यामुळे स्क्रॅब मटेरियलचे तिक्ष्ण तुकडे रस्त्यावर पडून वाहने पंक्चर होत आहेत. तसेच स्क्रॅब ने-आन करणाऱ्या वाहनांची नेहमी या दुकानांसमोर वर्दळ रहात असल्याने रहदारीलाही मोठे अडथळे निर्माण होत आहे. रात्री अवजड वाहनांची शहरातील रस्त्यांवरून सतत वाहतूक सुरु असते. ट्रक व ट्रेलर सारखी वाहने शहरातील रस्त्यांनी वाहतूक करतांना दिसतात. शहरातील रस्त्यांवरून अवजड वाहतूक होत असल्याने या वाहनांमुळे नेहमी अपघाताची संभावना निर्माण झालेली असते. वाहतुकीला नियम लावतांना याही समस्या सोडविण्याकडे वाहतूक पोलिस उपनिरीक्षक लक्ष घालतील काय, हा प्रश्न आता शहरवासियांमधून उपस्थित होऊ लागला आहे.





No comments: