प्रशांत चंदनखेडे वणी
विवाहित महिला व एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शास्त्री नगर येथे घराशेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय बालिकेला मोबाईलवर पिक्चर दाखविण्याच्या बहाण्याने आरोपीने आपल्या घरी नेले, व तिचा विनयभंग केल्याची घटना 25 जुलैला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. बालिका ही आपल्या अंगणात खेळत असतांना शेजारी राहणारा युवक तिच्याजवळ आला, व तिला मोबाईलवर पिक्चर दाखविण्याची भुरळ घालून आपल्या घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केल्याने तिने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी मुलीला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले व शेजारी राहणाऱ्या युवकाने मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदविली. कुटुंबियाच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी नासीर शेख मो. शेख (२५) याच्यावर भांदविच्या कलम 354(अ) व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपिआय दत्ता पेंडकर करीत आहे.
विनयभंगाची दुसरी घटना शहरापासून जवळच असलेल्या राजूर (कॉ.) येथे काल ३ ऑगष्टला रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. विवाहित महिला घरी एकटी असताना आरोपी हा महिलेच्या घरी पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने गेला, व वाईट उद्देशाने महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी वैभव उर्फ दत्ता नागोजी पिदुरकर याच्यावर भांदविच्या कलम 354(ड), 452 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार कांबळे करीत आहे.

No comments: