Latest News

Latest News
Loading...

आम आदमी पार्टीच्या तालुका संयोजकाला मारहाण केल्या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह सहा आरोपींवर गुन्हे दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी 

आम आदमी पार्टीच्या वणी तालुका संयोजकावर स्टील रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्या प्रकरणी सहा आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील दीपक चौपाटी परिसरातील एका टी-कॅन्टीनवर पाच जनांनी त्यांना हेरून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत ते पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यास गेले असता आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नावाचा समावेश करण्यावरून त्यांची तक्रार नोंदविण्यात न आल्याने त्यांनी थेट पोलिस महासंचालकांचे कार्यालय गाठून आपबिती कथन केली. पोलिस महासंचालकांच्या आदेशावरून काल १० ऑगष्टला रात्री उशिरा वणी पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेत आरोपींमध्ये एका प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश केला आहे. 

आम आदमी पार्टीचे वणी तालुका संयोजक निखिल धर्मा ढुरके (२५) रा. रंगनाथ नगर यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या नुसार ते ९ ऑगष्टला दुपारी ४.३० वाजता दीपक चौपाटी परिसरातील एका चाय कॅन्टीनवर आपल्या मित्रासह चाय पिण्याकरिता गेले होते. चाय पिल्यानंतर त्यांचा मित्र तेथून निघून गेला. निखिल ढुरके हे चाय कॅन्टीनवर एकटे असतांना दुचाकीने दोन जन तेथे आले. त्यांनी तू अवैध धंद्याबाबत निवेदन का दिले म्हणून निखिल ढुरके यांच्याशी वाद घालत त्यांना स्टील रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यात आणखी तीन जन तेथे आले, व त्यातील दोघांनीही निखिलला मारहाण करणे सुरु केले. चौघांनी मिळून निखिल ढूरके यांना स्टील रॉडने जबर मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा डावा हात व उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना झालेल्या मारहाणीनंतर ते प्राथमिक उपचार करून पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्याकरिता गेले असता आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकऱ्याचा समावेश करण्यावरून त्यांची पोलिसांशी तू-तू मै-मै झाली. वणी पोलिस स्टेशनला समाधानकारक तक्रार नोंदवून घेण्यात न आल्याने निखिल ढुरके यांनी थेट अमरावती विभागाच्या पोलिस महासंचालकांची भेट घेऊन आपबिती कथन केली. पोलिस महासंचालकांच्या आदेशावरून वणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सहाही आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. 

पोलिसांनी मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या आरोपींमध्ये इजहार ग्यासुद्दीन शेख, असलम अब्बास पठाण, वसीम शेख, ताहीर शेख रफिक शेख, अल्ताफ चिरी व एका अनोळखी इसमाचा समावेश असून या सहाही आरोपींवर भादंवि च्या कलम ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०६, १०९ तथा सहकलम ३(२)(v), ३(२)(va), ६ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, एपीआय राजेश पुरी करीत आहे. 

या मारहाण प्रकरणाला जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समजते. निखिल ढुरके यांनी अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. तसेच त्यांनी इजहार शेख यांचे कार्यालय अतिक्रमित जागेत असल्याचा दावा करीत नगर पालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. याचाच राग मनात धरून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचा त्यांनी थेट आरोप केला आहे. तसे त्यांनी तक्रारीतही नमूद केले आहे. निखिल ढुरके हे आम आदमी पार्टीचे संयोजक झाल्यानंतर ते राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्या उचलून धरल्या. रंगनाथ नगर व आसपासच्या परिसरात अतिक्रमित जागेवर अनेक वर्षांपासून घरे बांधून रहात असलेल्या नागरिकांना कायम पट्टे देण्याच्या मागणीला घेऊन त्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांची वाढती सामाजिक व राजकीय लोकप्रियता बघता त्यांना टार्गेट करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

No comments:

Powered by Blogger.