प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील एका घटस्फोटित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १० ऑगष्टला सकाळी उघडकीस आली. रत्ना वसंतराव वानखेडे (३२) असे या गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
मृतक रत्ना ही आपल्या पतीपासून वेगळी होऊन माहेरी वास्तव्याला होती. आपल्या सात वर्षीय मुलीला घेऊन ती आई वडिलांकडे राहत असतांना आज अचानक तिने टोकाचा निर्णय घेतला. पती पासून सोडचिठ्ठी घेतल्यानंतर ती खंबीरपणे जीवन व्यथित करीत असतांना तिला नैराश्येने ग्रासले. जगण्याची उमेद घालवून तिने आत्महत्येचा पर्याय निवडला. वडील शेतात तर आई बाजूच्या खोलीत असतांना तिने राहत्या घरीच गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. कुटुंबियांना ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. रत्ना हिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. पण तिने आत्महत्या केल्याने ७ वर्षाची चिमुकली मात्र आईच्या मायेला मुकली आहे. तिच्या अशा या अकाली जाण्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments: