Latest News

Latest News
Loading...

थरार... कुऱ्हाडीचे १५ ते २० घाव घालून युवकाची निर्घृण हत्या, शुल्लक कारणावरून दोन युवकांमध्ये झालेला वाद गेला विकोपाला

प्रशांत चंदनखेडे वणी 

शुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील मार्डी या गावात काल ९ ऑगष्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. आठवडी बाजाराच्या चौफुलीवर हा थरार घडला. काल ९ ऑगष्टला मार्डी येथील आठवडी बाजार असल्याने आसपासच्या गावातील बरेच लोक मार्डी येथे बाजाराकरिता आले होते. गर्दीने फुलून असलेल्या आठवडी बाजारात अनोळखी युवकांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने मार्डी येथे राहणाऱ्या युवकाने मजरा येथील युवकावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. कैलास उर्फ गोलू बंडू सोयाम (२१) रा. मजरा ता. मारेगाव असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर प्रदीप गोविंदा भालशंकर (३०) असे या खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी हा तापट स्वभावाचा असल्याचे बोलल्या जात आहे. मजरा येथील गोलू सोयाम हा युवक मार्डी येथे येऊन मिळेल ती कामे करायचा. काल मार्डी गावात आठवडी बाजाराचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी होती. आसपासच्या गावातील लोक बाजाराकरिता मार्डी येथे आले होते. मार्डी या गावातील रहिवासी असलेला प्रदीप भालशंकरही आठवडी बाजारात गेला होता. तेथे गोलू सोयाम याचा कुणाशी तरी शाब्दिक वाद सुरु असतांना आरोपीने त्यांच्या वादात तोंड घातले आणि हा थरार घडला. कैलास व प्रदीप यांच्यातच नंतर वादाची ठिणगी पेटली, व त्याचा भडका होऊन कैलास सोयाम याचा नाहक बळी गेल्याची चर्चा गावातून ऐकायला मिळत आहे. प्रदीप भालशंकर हा तापट स्वभावाचा असल्याने दोघांमध्ये झालेल्या वादानंतर त्याने घरून कुऱ्हाड आणून कैलास सोयाम याच्यावर कुऱ्हाडीने सपासप १५ ते २० घाव घातले. यात कैलास योयम हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अनोळखी युवकांमध्ये अतिशय शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. रागाच्या भरात कुऱ्हाडीचे घाव घालत युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने शांतता प्रिय असलेले मार्डी गाव हादरले आहे. कुऱ्हाडीचे घाव घातल्यानंतरही आरोपी बराच वेळ घटनास्थळावर कुऱ्हाड घेऊन उभा राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या कैलासला ग्रामीण रुग्णालयात हलविले. येथे पोहचताच डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जनार्धन खंडेराव करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.