Latest News

Latest News
Loading...

शहरातील तीन मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कार्यवाही, सहा आरोपींना अटक तर एक आरोपी पसार


  
प्रशांत चंदनखेडे वणी 

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचना असल्याने वणी पोलिसांनी अवैध धंद्यांवर धाडसत्र अवलंबलं आहे. ११ व १२ ऑगष्टला शहरातील तीन मटका अड्ड्यांवर धाडी टाकून पोलिसांनी आपले इरादे स्पष्ट केले आहे. शहरात राजरोसपणे मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या तीन अवैध मटका व्यवसायांवर कार्यवाही करून सहा मटका बहाद्दरांना अटक केली आहे. या तीनही कार्यवाहीत पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम व मटका साहित्य असा एकूण ४२ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला  आहे. 

शहरातील दीपक चौपाटी परिसर व भाजी मार्केट येथे राजरोसपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर पोलिसांनी ११ व १२ ऑगष्टला दुपारी व सायंकाळच्या सुमारास धडक कार्यवाही केली. शहरात वरळी मटका सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहरात काही ठिकाणी बिनधास्त सट्टा मटका खेळला जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी दुपारी ३.४५ ते ४.३० वाजताच्या दरम्यान दीपक चौपाटी परिसरातील मटका अड्ड्यावर धाड टाकली. तेथे मटका पट्टी फाडणारा आसिफ खान जमाल खान (४०) रा. शास्त्री नगर हा पोलिसांना पाहून पळत सुटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान पोलिसांनी मटका अड्डा सुरु असलेल्या ठिकाणाची पाहणी केली असता त्यांना मटक्याचे आकडे लिहिण्याकरिता वापरण्यात येणारे डुप्लिकेट बुक व १५ हजार ५०० रुपये रोख मिळून आले. पोलिसांनी रोख रक्कम मटका साहित्य जप्त करून पसार झालेल्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. 

दुसरी कार्यवाही ११ ऑगष्टला ६.४० ते ७.२० वाजताच्या दरम्यान दीपक चौपाटी परिसरातीलच लाकडी टॉलच्या बाजूला सार्वजनिक खुल्या जागेवर खेळल्या जाणाऱ्या मटका जुगारावर करण्यात आली. या ठिकाणी सट्टा मटका खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे काही इसम मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळतांना आढळून आले. सट्टा मटक्यावर पैशाचा जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली. मटका पट्टी फाडतांना हे चारही जन घटनास्थळीच मिळून आले. पोलिसांनी अमित संतोष झाडे (२२) रा. शास्त्री नगर, संतोष नामदेव इचवे (२७) रा. काळे ले-आऊट, लक्ष्मण रघुनाथ ओंढरे (३९) रा. रंगनाथ नगर, शंकर गणपत धंदरे (५०) रा. पटवारी कॉलनी यांना अटक केली असून त्यांच्या जवळून मटका साहित्य व रोख रक्कम असा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

मटका जुगावरील तिसरी कार्यवाही १२ ऑगष्टला दुपारी ४.४५ ते ५.१५ वाजताच्या दरम्यान भाजी मार्केट येथे करण्यात आली. भाजी मार्केट येथे सट्टा मटका खेळला जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता तेथे दोन जन मटका पट्टी फाडतांना आढळून आले. मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळविणाऱ्या दोनही आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळून मटका साहित्य व रोख रक्कम असा एकूण १९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सट्टा मटक्यावर पैशाचा जुगार खेळविणाऱ्या शेख मजहर शेख हसन (२६) रा. जत्रा रोड, रंगनाथ नगर, हाफिज अब्दुल सत्तार (४३) रा. मोमीनपुरा या दोन आरोपींना अटक केली असून सर्वच आरोपींवर भादंविच्या कलम १०९ व १२(अ) मजुका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार  विकास धडसे, पोना शुभम सोनुले, सागर सिडाम यांनी केली. मटका अड्ड्यांवरील या धडक कार्यवाहीने अवैध धंदे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 


No comments:

Powered by Blogger.