शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना करावा लागतो धोकादायक प्रवास, रस्ता दुरुस्ती व बस सेवा उपलब्ध करून देण्याची करण्यात आली मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
मोहदा ते वेळाबाई या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून मोहद्यावरून वेळाबाई येथिल शाळेत शिक्षणाकरिता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्याने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यातल्यात्यात मोहद्यावरून वेळाबाई करिता बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना ट्रकांमध्ये बसून शाळेत जावे लागत असल्याने त्यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय धोक्याचा झाला आहे. कधी शाळेच्या वेळेवर ट्रकच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे कठीण झाले आहे. प्रवासी सुविधेअभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागलं आहे. प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने कधी विद्यार्थ्यांच्या शाळा बुडतात, तर कधी शाळेत जाण्यास उशीर होत असल्याने त्यांना काही विषयांच्या शिकवणीला मुकावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहे. चार किलोमीटरचा धोकादायक रस्ता व त्यावरून करावा लागणारा धोकादायक प्रवास सन्मान स्त्री शक्ती संघटनेच्या अध्यक्षा किरण देरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व वणी आगार गाठले. तहसीलदार, आगार प्रमुख व सार्वजणीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी मोहदा ते वेळाबाई रस्त्याची दुरुस्ती व बस सेवा सुरु करण्याची मागणी केली.
मोहदा या गावातील आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता गावापासून चार किमी दूर वेळाबाई येथे जावे लागते. मोहदा ते वेळाबाई या ४ किमी रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना जीवावर उद्धार होऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याने मार्गक्रमण करणे अतिशय धोकादायक झाले आहे. त्यातच या मार्गाने बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांमध्ये बसून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. बस सेवा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना ट्रकांमध्ये बसून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थिणींनाही ट्रकांमध्ये बसून शाळेत जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धोकादायक रस्त्यावरून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या धोकादायक प्रवासामुळे पालकवर्ग नेहमी चिंतेत असतो.


No comments: