प्रशांत चंदनखेडे वणी
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास नवी पिढी समृद्ध भवितव्य घडवेल, त्यासाठी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही वाचन करण्याची सवय व गोडी पालकांनी मुलांना लावणे गरजेचे आहे, तेंव्हाच विद्यार्थी ज्ञानी व प्रगल्भ बनतील, पालकांनी स्वतःच्या चैनीच्या वस्तू न घेता नवनवीन पुस्तके खरेदी केल्यास मुलेही ते वाचतील आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांच्या विचारांची पातळी उंचावेल, असे मनोगत लो.टी. महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांनी व्यक्त केले. ते वसंत जिनिंग सभागृह येथे मादगी बहुउद्देशीय संस्था व समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चरणदास कोंडावार (माजी नायब तहसीलदार) होते. तर उदघाटक म्हणून प्रा. सुनिल मिद्दे (महासचिव एमएच४ महासंघ) उपस्थित होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर लाटेलवार (कोषाध्यक्ष एमएच४ महासंघ), विठ्ठल शंकावार ( जेष्ठ समाजसेवक), व्यंकटी अंधेवार, प्रदीप आधारे, निलेश परगंटीवार, सुरज चाटे, रवि कोमलवार, दीपक मुल्लमवार, जी.आर. रेड्डी, नत्थू नगराळे हे विराजमान होते. सुनिल मिद्दे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात समाजातील गरजू विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमात कुठल्याही प्रकारची मदत महासंघाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे म्हटले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चरणदास कोंडावार यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून कठोर मेहनत व जिद्द बाळगल्यास बिकट परिस्थितीवरही सहज मात करता येईल, असे विद्यार्थ्यांचं मनोबल वाढविणारे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
या सोहळ्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या तसेच विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश तालावार यांनी तर आभार प्रदर्शन अरुण एनपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरज चाटे,रवि कोमलवार,राकेश शंकावार, किशोर मंथनवार, विक्की परगंटीवार, रीतिक मामिडवार, रीतिक बेलेवार, नागेश मोहूर्ले, शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, मनिष वालकोंडे, मोरेश्वर कुंटलवार, कैलास पौन्नलवार व समाजबांधवांनी सहकार्य केले.


No comments: