वणी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांकरिता मिळाला बक्कळ निधी, तरीही शहर व तालुक्यातील रस्ते भोगत आहे नरक यातना
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांकरिता बक्कळ निधी खेचून आल्याचा दावा करण्यात आला असला तरी वणी शहर व तालुक्यात विकासकामांचा वानवा दिसून येत आहे. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ग्रामीण भागांकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते विकासाची वाट बघत असतांना विकासाचा मात्र अद्याप मुहूर्त निघाल्याचे दिसत नाही. बहुतांश रस्ते हे खड्ड्यांनी व्यापले आहेत. शहर व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डेमय रस्त्यांवरून वाहने चालवितांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जनतेतून ओरड झाली की, एखाद्या रस्त्याचे बांधकाम हाती घेतले जाते. पण रहदारीच्या अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यांच्या बांधकामाचा नारळ कधी फुटेल, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. संथ गतीने सुरु असलेल्या विकासकामांमुळे रस्ते विकासाला खीळ बसली आहे. रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून रस्ते दुरुस्ती करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे मनसेने रस्त्यावरील या खड्ड्यांना कमळाचे फुल वाहून शहरात वेगळ्या प्रकारचे आंदोलन केले. यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्दर्शनात मनसेच्या तालुका शाखेच्या वतीने मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना कमळाचे फुल वाहून एक वेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना प्राधान्य देण्याचे सूतोवाच केले जात असले तरी विकासकामांना अद्याप गती मिळाल्याचे दिसत नाही. वणी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांकरिता रेकॉर्ड ब्रेक निधी खेचून आणल्याचे सांगत पाठ थोपटून घेण्यात आली असली तरी वणी शहर व तालुक्यात विकासकामांना पाहिजे तशी चालना मिळाल्याचे दिसून येत नाही. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण भागांना जोडणारे रस्तेही विकासाची वाट बघत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. खान बाधित रस्त्यांचीही मोठी दुर्दशा झाली आहे. खान बाधित क्षेत्रातील विकासाकरिता सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. रस्ते बांधकाम व दुरुस्ती करण्याच्या मागण्यांना घेऊन मागील तीन ते चार महिन्यात अनेक निवेदने व आंदोलने करण्यात आली. रस्त्यांवरील खड्डे व चिखलामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना या रस्त्यांनी जाणे येणे करणे कठीण झाले आहे. शहर व तालुक्यात प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. शहरवासीयांना अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. पूर परिस्थिती व पूर बाधितांचे प्रश्न अद्याप सुटले नाहीत. औद्योगिक विकासाचे मुद्दे अधांतरी आहेत. त्यामुळे तालुक्याला अद्यापही विकासाची प्रतीक्षाच लागली असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांची झालेली दुर्दशा बघता याकडे लक्ष वेधण्याकरिता मनसेच्या तालुका शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना कमळाचे फुल वाहून एक वेगळ्या प्रकारचे आंदोलन केले.



No comments: