प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील विरकुंड ग्रामपंचायतेला कुणीही वाली राहिला नसल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतेचा कारभार रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतेला वेळोवेळी कुलूप लागलेले असते. ग्रामपंचायतेत ग्रामसेवक किंवा संबंधित कर्मचारी पूर्णवेळ हजर रहात नसल्याची तक्रार नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. ग्रामपंचायत सरपंचावर अविश्वास आणल्यानंतर या ग्रामपंचतेचा कारभार उपसरपंच हाकत आहे. ग्रामसचिव देखील आठवड्यातून दोनच दिवस ग्रामपंचायतेत हजेरी लावत असल्याने अनेक कार्यालयीन कामे रखडली आहेत. विरकुंड ग्रामपंचायतेला त्यांचे दोन दिवस ठरलेले असतांना दोन दिवसही ते पूर्ण वेळ ग्रामपंचायतेला देत नसल्याची ओरड गावातून ऐकायला मिळत आहे. ग्रामपंचायतेला सरपंच तर नाहीच, अन सचिवही पूर्णवेळ हजर रहात नसल्याने गावकऱ्यांची महत्वपूर्ण कामे खोळंबली आहे. गावकऱ्यांना महत्वाचे कागदपत्र मिळणे कठीण झाले आहे. विरकुंडसह विठ्ठलनगर, दहेगाव, डोंगरगाव या गावांमध्ये समस्यांचा डोंगर तयार झाला आहे. मूलभूत सोइ सुविधांपासून नागरिक वंचित राहू लागले आहे. गावातील समस्या सोडविण्याकडे गाव पुढारी लक्ष द्यायला तयार नसल्याची व्यथा येथील गावकऱ्यांनी मांडली आहे.
पाच गावांमिळून विरकुंड ही गट ग्रामपंचायत आहे. तरीही या ग्रामपंचायतीला पूर्ण दिवस ग्रामसेवक देण्यात आलेला नाही. ग्रामपंचायतेच्या माध्यमातून गावांमध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही. विठ्ठलनगर येथील जनता आजही सिमेंट रस्ते व नाल्याच्या प्रतीक्षेत आहे. दहेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. डोंगरगाव येथेही सिमेंट रस्ते व नाल्या बांधण्यात आल्या नसल्याने ग्रामपंचायत येथील नागरिकांची कुचंबना करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. विकासाचं केवळ राजकारण केलं जात असल्याचं एकूणच चित्र पहायला मिळत आहे. गावातील काही भागांमध्ये अद्याप सिमेंट रस्ते बांधण्यात आले नाही. गावात सांडपाणी वाहून नेण्याकरिता नाल्याही नाही. काही गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पांदण रस्त्यांपेक्षाही बिकट अवस्था येथील रस्त्यांची झाली आहे. चिखल तुडवीत रस्त्याने जावे लागत आहे.


No comments: