वणी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकाऱ्यांचे दर्शन झाले दुर्लभ, प्रभावहीन कर्तव्याची नागरिकांत चर्चा
प्रशांत चंदनखेडे वणी
प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी वर्गांची राहणारी अनुपस्थिती चिंतेचं कारण बनली आहे. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची महत्वाची कामे वेळेत होत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी वर्ग कार्यालयांमध्ये हजर रहात नसल्याने अनेक महत्वाची कामे रेंगाळत पडली आहे. नागरिकांची कार्यालयीन कामे करतांना मोठी दिरंगाई होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नागरिकांना महत्वाची कागदपत्रे प्राप्त करतांना कमालीचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. कागदपत्रे मिळविण्याकरिता प्रशासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहे. अधिकाऱ्यांची कार्यालयात राहणारी अनुपस्थिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी चव्हाट्यावर आणली होती. काही दिवसांपूर्वी राजू उंबरकर यांनी दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेत त्यांचे नक्षल्यांनी अपहरण केल्याची पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. परंतु परिस्थिती अद्यापही बदलेली नाही. वणी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात निरीक्षण अधिकाऱ्यांचं कधी दर्शनच होत नसल्याच्या तक्रारी कार्यालयीन कामांकरिता येणाऱ्या नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांची खुर्ची नेहमीच खाली दिसते. त्यांचा कार्यालयीन वेळ काळ निश्चित नसल्याचे ऐकायला मिळत आहे. ते कार्यालयात कधी येतात व कधी जातात हेच कळायला मार्ग नाही. त्यांना कार्यालयीन वेळेचे कुठलेही बंधन नसल्याचे दिसून येत आहे. पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन येणारा प्रत्येकच जण साहेबांची भेटच होत नसल्याची खंत व्यक्त करतांना दिसतो. त्यांची भेट होत नसल्याने तक्रारकर्ते व महत्वाची कामे घेऊन आलेले नागरिक निराश होऊन आल्या पाऊली परत जातांना दिसतात. त्यामुळे पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांसाठी कर्तव्याच्या तासिका निश्चित नाही काय, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
वणी तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यावर वणी, मारेगाव व झरी या तीनही तालुक्यांचा भार देण्यात आला आहे. त्यांचे वणी कार्यालयाकरिता दोन दिवस निश्चित करण्यात आले आहे. पण ठरलेल्या दिवसांत ते कार्यालयात उपस्थित राहतीलच याची शाश्वती रहात नसल्याच्या तक्रारी कार्यालयीन कामांकरिता येणाऱ्या नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. त्यांना वेळ काळाचे बंधनच नसल्याचे दिसून येत आहे. त्यांची कार्यालयातील अनिश्चितता कार्यालयीन कामांकरिता येणाऱ्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. ते कार्यालयात कधी येतात व कधी जातात हेच कळत नसल्याचे नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. पुरवठा विभाग हा अतिशय महत्वाचा विभाग असतांना याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी रहात नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. अन्नधान्य व खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये , याची दक्षता घेण्याची जबाबदारी पुरवठा निरीक्षकांची असते. पण पुरवठा निरीक्षण अधिकारीच कार्यालयात पूर्णवेळ हजर रहात नसल्याने येथे सर्वांसाठीच रान मोकळं आहे. अधिकारीच कार्यालयात हजर रहात नसल्याने कर्मचारीही बिनधास्त झाले आहेत. कार्यालयीन कामे करतांना ते नागरिकांना चांगलेच वेठीस आणू लागले आहेत. नागरिकांना वेठीस आणून त्यांच्याकडून आपले खिसे गरम करू लागले आहेत. नागरिक रेशन कार्ड व अन्य महत्वाची कागदपत्रे मिळविण्याकरिता होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांचे हित जोपासणे पसंद करतांना दिसत आहे. पुरवठा विभागात शासकीय कर्मचारी कमी व मानधनावर ठेवलेले कर्मचारी जास्त आहेत. पुरवठा विभागाचा डोलाराच त्यांच्या खांद्यावर आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थितच रहात नसल्याने खाजगी कर्मचाऱ्यांसाठी रान मोकळं असते.
वणी शहर व तालुक्यात हॉटेल्स, खाद्य पदार्थांची छोटी मोठी दुकाने, स्वीटमार्ट, अन्नधान्य विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. या दुकानांमध्ये भेसळ तर होत नाही ना, याचे साधे निरीक्षणही केले जात नाही. आपल्या पदाचे गांभीर्य ओळखून कर्तव्य बजावले जात नसल्याच्या खुल्या तक्रारी आता जनतेतून ऐकायला मिळत आहे. त्यांनी अलीकडच्या काळात खाद्यपदार्थ व अन्नधान्य विक्रीच्या दुकानांचे निरीक्षण करून भेसळ करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे जाणवत नाही. कार्यालयात ते कधी बसलेच तर त्यांचा जास्त वेळ मोबाईल हाताळण्यातच जात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. स्वस्त धान्य दुकानातून नियमित अनाज मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. काही रेशन दुकानातून निकृष्ठ धान्य मिळत असल्याच्या तक्रारीही ऐकायला मिळत आहे. स्वस्त धान्य दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळही निश्चित नसल्याचे ऐकायला मिळत आहे. अनेकांना रेशन कार्डवर अनाजच मिळत नसल्याने ते पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवितांना दिसतात. नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केलेल्यांना रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल, हे ही निश्चित सांगितले जात नसल्याने अर्जधारक कार्यालयाच्या चकरा मारतांना दिसतात. नवीन रेशनकार्डसाठीचे कित्येक अर्ज अद्याप प्रलंबित असून नागरिकांना रेशनकार्ड मिळण्याची प्रतिक्षा लागली आहे. स्वस्त धान्य दुकानातील अनाजामध्येही भेसळ होत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी ऐकायला मिळाल्या. पाच सहा महिन्यांपूर्वी लालगुडा येथील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या तांदळातुन युरिया मिश्रित केल्यागत दुर्गंधी येत असल्याची ओरड गावातून ऐकायला मिळाली. शहरातील कोळसाखाणींमध्ये व ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये सर्रास टँकरने डिजेल विक्री सुरु आहे. वेकोलिशी अधिनस्त असलेल्या हेवीवेट कंपन्यांमध्ये टँकरने बायो डिजेलची विक्री होत असल्याच्या तक्रारी कंपनीतीलच कामगारांमधून ऐकायला मिळत आहे. टँकरच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या डिजेलमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत असतांना पुरवठा निरीक्षण अधिकारी मात्र साधे निरीक्षण करतांना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वणी तालुक्यात सगळं काही खपत असल्याने येथे दुकानदार मोठी चलाखी करतांना दिसतात. त्यामुळे येथे पुरवठा निरीक्षण अधिकारी पूर्णवेळ व कर्तव्यदक्ष असणं गरजेचं आहे. येथील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांवर तीन तालुक्यांचा भार देण्यात आला असून त्यांचं प्रभावहीन कर्तव्य तालुक्यातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागलं आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

No comments: