प्रशांत चंदनखेडे वणी
एम. आर. पत्रे यांनी यावेळी फळबाग लागवड, मिरची लागवड, शेततलाव योजना, पीएमएफएमई योजना, पीएम किसान निधी योजना याबाबत योग्य मार्गदर्शन करतांनाच शासनाच्या कास्तकारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता करावी लागणारी ऑनलाईन प्रक्रियाही त्यांनी यावेळी समजावून सांगितली. तसेच कीटकनाशके खरेदी करतांना घ्यावयाची काळजी व फवारणी करतांना घ्यावयाची दक्षता याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. फवारणी करतांना विषबाधा होणार नाही, याची दक्षता कशी घ्यायची, याचे त्यांनी शेतात प्रात्याक्षिक करून दाखविले.
डी.आर. बरडे यांनीही यावेळी शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केले. कापूस, तूर व सोयाबीन पिकांवरील कीड, रोग व त्यावरील उपाय याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कापूस पिकांवर गुलाबी बोन्ड अळीने हल्ला केल्यानंतर तिच्या पासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता कामगंध सापळेचा वापर कसा करावा, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांनाच त्यांनी शेतात प्रात्याक्षिक करून दाखविले.
खांदला ग्रामपंचायतेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या कृषी विषयक मार्गदर्शन शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांना कापूस पिकांकरिता निविष्ठा तसेच कामगंध सापळे व लुर्सचा वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणी किट देण्यात आली. या शिबिरात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.


No comments: