प्रशांत चंदनखेडे वणी
वणी आगारात बस चालक म्हणून कर्तव्यरत असलेले प्रविण शिवराम पथाडे (४१) रा. पुरड हे वणी आगाराची वणी बोर्डा ही बस (MH ४० N ८६७५) घेऊन बोर्डा मार्गाने प्रवासी घेत जात असतांना मोहर्ली गावाजवळ बस का थांबविली नाही, या कारणावरून विरकुंड येथील दोन तरुणांनी बस चालकाशी वाद घालत त्याला बस मधून खाली खेचले व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. विरकुंड येथील काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करून या तरुणांना पिटाळून लावल्याने प्रकरण थोडक्यात निपटले. बसमध्ये आधीच १०५ प्रवासी असल्याने मोहर्ली येथून विद्यार्थ्यांना बसविणे शक्य नव्हते. त्यामुळे बस विरकुंडच्या दिशेने समोर निघाली. विरकुंडला बस थांबताच दोन तरुण बस जवळ आले, व त्यांनी सरळ बस चालकाची कॉलर पकडून त्याला खाली खेचले. त्या दोघांनीही बस चालकाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. बस चालक बस घेऊन वणी आगारात आल्यानंतर त्याने आगार प्रमुखाला घडलेली घटना सांगितली. आगार प्रमुखांनी बस चालकाला तात्काळ पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितले. आगार प्रमुखांनी सुचविल्या प्रमाणे बस चालक प्रविण पथाडे यांनी रात्री १०.५२ वाजता पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. बस चालकाच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी राकेश अशोक परचाके (२०) रा. विरकुंड आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक केली असून त्यांच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार संतोष अढाऊ करीत आहे.

No comments: