Latest News

Latest News
Loading...

"कानून के हाथ बहुत लंबे होते है," ठाणेदार गजानन कारेवाड यांनी घडविला साक्षात्कार, संशयिताला केली दिल्ली वरून अटक

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहदा गावालगत एका गिट्टी खदानीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना ५ सप्टेंबरला उघडकीस आली होती. मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्या महिलेचा खून झाल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. महिलेचा खून करून मृतदेह पाण्यात फेकल्याचा निष्कर्ष शिरपूर पोलिसांनीही नोंदविला होता. अज्ञात मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा विविध अँगलने व खोलात जाऊन तपास करीत ठाणेदार गजानन कारेवाड यांनी "कानून के हाथ लंबे होते है" याचा परत एकदा साक्षात्कार घडविला आहे. गजानन कारेवाड यांनी अनेक गंभीर व रहस्यमय प्रकरणांचा उलगडा करून आरोपींना तुरुंगात डांबले आहे. या रहस्यमय खून प्रकरणाचाही उलगडा लवकरच होणार असून आरोपीच्या शोधात एक पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे. संशयित आरोपी या पथकाच्या हाती लागला असून त्याला घेऊन पोलिस पथक परतीच्या मार्गावर लागलं आहे. ठाणेदार गजानन कारेवाड यांनी वेळोवेळी तपास कौशल्य दाखवून "गुन्ह्यांना माफी नाही" हे सिद्ध करून दाखविलं आहे.

मोहदा येथील गौण खनिज उत्खनन करणाऱ्या खदानीत पाणी साचून खदानीला तलावाचं स्वरूप आलं आहे. खदानीत साचलेल्या पाण्यात गुराख्यांना एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली. पोलिसांच्या कानापर्यंत ही वार्ता आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह खदानी बाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना सदर मृतदेह खान क्षेत्रातच काम करणाऱ्या परप्रांतीय महिलेचा असल्याचे कळाले. सरिता लालबाबू पंडित उर्फ सरिता राजन पंडित (२२)असे या मृतक महिलेचे नाव असल्याचे पोलिस तपासात समोर आले. ती मुळची बिहार येथिल रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता ती आपल्या नवऱ्या बरोबर मोहदा येथीलच रहिवासी वस्तीत रहात असल्याचे समोर आले. दोघा नवरा बायकोत कडाक्याचे भांडण झाल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. महिलेचा पती गावातून फरार असल्याचेही पोलिस तपासात समोर आले. मृतदेह संशयास्पद स्थितीत व पती गायब असल्याने पोलिसांचा संशय आणखीच बळावला. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. 

या रहस्यमय प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. ठाणेदार गजानन कारेवाड यांनी आपले तपास कौशल्य परत पणाला लावले. विविध अँगलने तपास करीत तपासाला एक दिशा दिली. अनेक बाबी तपासल्यानंतर पोलिसांना अखेर धागा गवसलाच. गुन्हेगार पोलिसांपासून काही काळ लपु शकतो, पण पोलिस कार्यवाही पासून वाचू शकत नाही. "पुलिस जहनुम से भी अपराधी को धुंड लाती है" हे काही असच नाही म्हणत. मृतक महिलेचा पती हा बिहार राज्यातील रहिवासी आहे, बस एवढीच माहिती पोलिसांजवळ होती. पोलिसांनी संशयित आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. लोकेशन दिल्ली येथे दाखवीत होते. ठाणेदार गजानन कारेवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता सपोनि रामेश्वर कांडुरे यांच्या नेतृत्वात विनोद मोतीराम व सुगत दिवेकर यांचं पोलिस पथक तयार करून दिल्लीला रवाना केलं. मिळालेल्या लोकेशनवरून आरोपीचा कसून शोध घेतला असता अखेर संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे. त्याला घेऊन पोलिस पथक परतीच्या मार्गावरही लागलं असल्याचे समजले आहे. हा संशयित व्यक्ती मुख्य आरोपी आहे, किंवा नाही हे लवकरच समोर येणार आहे. 

No comments:

Powered by Blogger.