Latest News

Latest News
Loading...

लाइमस्टोन खाणीत तयार झालेल्या तलावात बुडाले तीन तरुण, तालुक्यातील वांजरीलगत घडली व्ह्रदय हेलाविणारी घटना

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील वांजरी गावालगत असलेल्या लाइमस्टोन खाणीत पावसाच्या पाण्याने दोन मोठे तलाव तयार झाले असून या खोल तलावात पोहण्याचा मोह अनावर झालेल्या शहरातील तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. तलावालगत एक मोपेड दुचाकी व तीन तरुणांचे कपडे तथा दोन मोबाईल आढळून आल्याने हे तीनही तरुण तलावात बुडाल्याचा संशय बळावला आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजित जाधव यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झालं असून तलावात या तीनही तरुणाचा शोध घेतला जात आहे. रात्र झाल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण होत असून एनडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

वांजरी गावालगत लाइमस्टोनची खान आहे. या खाणीतून मोठ्या प्रमाणात लाइमस्टोनचे उत्खनन केले जाते. परंतु पावसाळ्यात या खाणीत पाणी साचून तलाव तयार होत असल्याने लाइमस्टोनचे उत्खनन बंद ठेवले जाते. याठिकाणी दोन मोठे तलाव तयार झाले आहेत. या तलावात पोहण्याकरिता आलेल्या शहरातील तीन तरुणांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तलावालगत एक मोपेड दुचाकी (MH २९ ५३४२), तीन तरुणांचे कपडे व दोन मोबाईल आढळून आल्याने हे तीनही तरुण तलावात पोहण्याच्या नादात बुडाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. आसीम अब्दुल सलाट शेख वय अं. १६ वर्षे, नुमान शेख सादिर शेख वय अं. १६ वर्षे दोन्ही रा. एकता नगर व प्रतिक संजय मडावी वय अं. १६ वर्षे रा. प्रगती नगर अशी या तरुणांची पोलिसांकडून नावे सांगितली जात आहे. 

यातील आसीम हा तरुण मोटारसायकल दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजवर काम करीत असल्याचे कळते. आज गॅरेज बंद असल्याने गॅरेज मधीलच दुचाकी घेऊन तो मित्रांसह तलावावर पोहण्याकरिता आल्याचे उपस्थितांकडून ऐकायला मिळाले. या तिघांचेही मृतदेह अद्याप गवसले नसून पोलिसांकडून शोध कार्य राबविले जात आहे. लाइमस्टोनच्या खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून दोन मोठमोठे तलाव तयार झाले आहे. खान परिसराकडे कुणीही जाणार नाही याची खबरदारी म्हणून व्यवस्थापकांनी कोणताही कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक तैनात केला नसल्याने याठिकाणी पोहण्याच्या मोहात तरुण येतात. आणि याच कारणाने ही विपरीत घटना घडली. तलावात तरुण बुडाल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली, व तलाव परिसरात बघ्यांची एकाच गर्दी उसळली. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.