गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या, पोलिसांकडून घेतला जात आहे दुचाकी चोरट्यांचा शोध
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पोलिस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्याने पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची शोध मोहीम आरंभली आहे. दुचाकी चोरट्यांची माहिती मिळवून पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केली आहे. आज ८ सप्टेंबरला दुपारी लालगुडा येथून एका दुचाकी चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळून होंडा शाईन ही त्याने चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे. ही कार्यवाही गुन्हे शोध पथकाने केली.
पोलिस स्टेशन मधील गुन्हे शोध पथक दुचाकी चोरट्यांची माहिती गोळा करीत असतांना त्यांना लालगुडा येथे राहणाऱ्या दुचाकी चोरट्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी लालगुडा येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याने शहरातील नटराज चौकातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी राजू सुरजपाल कोठारे (३०) या दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्या जवळून होंडा शाईन (MH २९ AG ६२३४) ही दुचाकी जप्त केली आहे. मोहर्ली येथील सुधाकर नामदेव अंड्रस्कर यांनी ४ सप्टेंबरला नटराज चौकातून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली होती. पोलिसांनी त्यावेळी अज्ञात चोरट्यावर कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. राजू कोठारे या दुचाकी चोरट्याजवळून जप्त केलेली दुचाकी ही सुधाकर अंड्रस्कर यांचीच असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांवर दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे गुन्हे शोध पथक अलर्ट मोडवर आलं असून पथकाने दुचाकी चोरट्यांची शोध मोहीम सुरु केलीआहे. दुचाकी चोरट्यांचा शोध घेत असतांना राजू कोठारे हा दुचाकी चोरटा गुन्हे शोध पथकाला गवसला.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, सपोनि सुदाम आसोरे, जमादार विकास धडसे, पोकॉ. शुभम सोनुले, सागर सिडाम, शंकर चौधरी, सुनिल नलगंटीवार यांनी केली.

No comments: