प्रशांत चंदनखेडे वणी
शहरालगत असलेल्या प्रेमनगर परिसरात धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन टपोरी तरुणांना गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. ही कार्यवाही आज ९ सप्टेंबरला करण्यात आली. तेजस मनोज भगत (१९) रा. भिमनगर व साहिल विरेंद्र खडसे (१९) रा. सम्राट अशोक नगर, ह.मु. दामले फैल अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमनगर परिसरातील झोपडपट्टी भागात दोन तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला त्याठिकाणी रवाना केले. गुन्हे शोध पथकाने प्रेमनगर परिसरात जाऊन पाहणी केली असता दोन तरुण त्याठिकाणी हल्ला कल्लोळ करतांना आढळून आले. हे दोनही तरुण मोपेड दुचाकीवर स्वार होते. दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाजवळ धारदार शस्त्र होते. हे दोनही तरुण परिसरातील महिला व पुरुषांना धमकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी त्यांचे दुचाकी वाहन थांबवून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून पोलिसांनी काळ्या रंगाच्या प्लास्टिक कव्हरमध्ये असलेला (म्यान) एक मोठा धारदार चाकू किंमत ५०० रुपये व मोपेड दुचाकी (MH २९ BS ४२१३) किंमत ३० हजार रुपये असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ४/२५, सहकलम ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, सपोनि सुदाम आसोरे, जमादार विकास धडसे, पोकॉ. मो. वसिम शेख, शुभम सोनुले, सागर सिडाम, शंकर चौधरी, सुनिल नलगंटीवार यांनी केली.


No comments: