Latest News

Latest News
Loading...

टोळक्याने येऊन मारहाण करण्याचे प्रकार वाढले, गौरक्षणच्या हिशोबावरून झाला दोन गटांत राडा


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरात संगठीत गुन्हेगारी वाढीस लागली आहे. टोळक्याने येऊन मारहाण करण्याच्या घटना सातत्याने वाढू लागल्या आहेत. अरेरावी, वादावादी व धमक्या देत दादागिरी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून शहरात गल्लोगल्ली भाई तयार झाले आहेत. त्यांना पोलिस व कायद्याचा धाक न उरल्यागत ते भाईगिरीचा आव आणू लागले आहेत. मिसवड न फुटलेले मुलंही दादागिरीची भाषा करू लागले आहेत. शहरातील रस्त्यांवर व चौकाचौकात गुत्थ्याने जमलेले तरुण धुमाकूळ घालतांना दिसतात. अश्लील शब्दांत जोरजोरात बोलणे, दुचाक्यांचे एक्सलेटर वाढवून आवाज करणे व धूम दुचाक्या चालविणे हे आता रोजचे रात्रीचे खेळ झाले आहेत. टपोरी युवकांच्या फौजांमध्ये शिक्षण घेणारे तरुणही सामील होऊ लागल्याने तरुण पिढीचं भवितव्य धोक्यात येऊ लागलं आहे. गुंड प्रवृत्तीच्या युवकांकडून शहरात तरुणांच्या टोळ्या तयार केल्या जात असून या टोळक्यातील तरुण कुणाशीही अरेरावी करून आपापल्या साथीदारांना बोलवितात. कधी ते टोळक्याने येऊन कुणाला मारहाण करतात तर कधी आपापसातच भिडतात. शहरात सुरु असलेली टोळक्यांची क्रेझ बघता हे टोळके कधी एकमेकांशी भिडेल व भडका होईल, याची आता मुळीच शाश्वती राहिलेली नाही. शहरातील उज्वल गौरक्षणमध्ये दोन गटांत झालेला राडा शहरात टोळी युद्धाचा भडका उडण्याची चाहूल देतो आहे. शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांना कठोर पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे. 

कोणत्याही प्रकरणात पोलिसांची आधी मदत न घेता आधी कायदा हातात घेतला जातो, व नंतर पोलिसांत तक्रार केली जाते. कुठेही गैरप्रकार होत असेल किंवा तसे पुरावे असेल तर पोलिस स्टेशनला सादर करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची तक्रार न करता आधी स्वतः हुज्जत घालून राडा केला जातो, आणि नंतर तक्रार नोंदविली जात असल्याचे अनेक प्रकरणं पोलिस स्टेशनला दाखल होत आहे. भांडण, मारामारी व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत. आपापसात भांडण व मारझोड केल्यानंतर दोनही गटातील लोक पोलिस स्टेशनला येतात, व पोलिस स्टेशनच्या आवारातच जोरजोरात ओरडतात. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या देतात. शहरात भाईगिरीला उधाण आहे. सामाज माध्यमांवर उत्तेजक व माथी भडकविणारे संदेश व व्हिडिओ अपलोड करून स्वतःची भाईगिरी दाखविली जाते. अश्लील शिवीगाळ व खुले आरोप या चित्रफितींमधून केले जात असतांना पोलिसांनी त्यांच्याकडून पुरावे गोळा करून कार्यवाही करणे अपेक्षित आहे. कोण तस्कर आहे, व कुणी तस्करीतून किती माया गोळा केली, याची चित्रफीत बनवून समाज माध्यमांवर वायरल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे गोळा करून संबंधितांवर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. किंवा त्यात काही सत्यता नसेल तर असे माथी भडकविणारे व्हिडिओ वायरल करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहरातील उज्वल गौरक्षण समोर दोन गटांत झालेल्या मारामारीमुळे शांतताप्रिय नागरिक कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला घेऊन चिंतेत आले आहे. गौरक्षण वरून आता रणकंदन सुरु झालं आहे. रासा येथिल श्रीराम गौरक्षणचा हिशोब दाखविण्यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अंगावर चालून येत मारहाण केल्याची तक्रार श्रीराम गौरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष नरेश हेमंतराव निकम यांनी केली. तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नरेश निकम यांच्यावर प्रत्यारोप केले आहे. नरेश निकम यांनी दिलेल्या तक्रारी नुसार गाईचे वासरु मृतावस्थेत आढळल्याने उज्वल गौरक्षण येथे त्याचा दफनविधी केल्यानंतर ते घराकडे जाण्यास निघाले असता अभि नागपुरे याने बजरंग दलाचे कार्यकर्ते संतोष लकशेट्टीवार व विशाल दूधबळे यांच्यासह दहा ते पंधरा जणांना त्याठिकाणी फोन करून बोलावले. संतोष आणि विशाल अचानक अंगावर धावून आले, व त्यांनी नरेश निकम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नरेश निकम यांच्या सोबत असलेल्या काही सहकाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यांना रोखले. विशाल व संतोष यांनी मारहाण करतांनाच गळ्यातील सोन्याची चैन व रोख १० ते १२ हजार रुपये हिसकावून घेतले. तसेच गौरक्षणचा हिशोब दाखव नाही तर तुझे सर्व काळे कारनामे उघड करेल अशी धमकी दिली. बजरंग दलाच्या कार्यक्रमाकरिताही त्यांनी पैशाची मागणी केली असल्याचे नरेश निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे. नरेश निकम यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी संतोष लकशेट्टीवार, विशाल दुधबळे, अभी नागपुरे, यांच्यासह आठ आरोपींवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२७, ५०४, ५०६, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

तर संतोष तुलसीदास लकशेट्टीवार याच्या तक्रारी नुसार तो अभी नागपुरे यांचा सुरक्षा प्रमुख म्हणून काम करतो. गाईचे वासरू मरण पावल्याने त्याचा अंतिम विधी करण्याकरिता अभी नागपुरे उज्वल गौरक्षण येथे गेले असता तेथे हजर असलेल्या नरेश निकम व पवन उरकुडे यांनी शिवीगाळ केल्याचे अभी नागपुरे यांनी फोन करून त्याला सांगितले. त्यांचा फोन आल्याने तो व विशाल दुधबळे काही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना घेऊन तेथे गेला असता नरेश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला शिवीगाळ करून त्याची कॉलर पकडून ओढाताण केली. या झटापटीत त्याची एक तोळ्याची सोन्याची चैन चोरीला गेली. संतोष लकशेट्टीवार याच्या तक्रारी वरून पोलिसांनी नरेश निकम, पवन उरकुडे, पवन बुऱ्हाण यांच्यासह आठ जणांवर त्याच पद्धतीचे गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे. 

 

No comments:

Powered by Blogger.