प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील टिळक चौक ते विराणी टॉकीज रोडवरील माळीपुरा परिसरात असलेले फर्निचरचे दुकान जेसीबीने जमीनदोस्त केल्याची घटना १२ ऑक्टोबरला पहाटे उघडकीस आली. दुकानामध्ये लाखो रुपयांचे साहित्य, किंमती वस्तू, सोन्या चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असल्याचे सांगण्यात येते. मालमत्तेच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. जागेच्या मालकीहक्कावरून अनेक वर्षांपासून दोन जणांमध्ये वाद सुरु आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ देखील आहे. १० ते १२ वर्षांपासून भंडारी हे या ठिकाणी फर्निचरचे दुकान थाटून आहेत. त्यांचा मालमत्तेच्या मालकीहक्कावरून सुरु असलेला संघर्ष न्यायालयापर्यंत पोहचला. दोघांनीही न्यायालयात मालमत्ते बाबत दावा सादर केला. त्यांची न्यायालयीन लढाई सुरु आहे. अशातच मालमत्ता धारकाकडून टोकाचे पाऊल उचलण्यात आले. दुकानावर बेकायदेशीरपणे जेसीबी चालवून दुकानाची नासधूस करण्यात आली. दुकानदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून जेसीबी ऑपरेटर व काही जणांना तात्काळ अटक केली. परंतु मुख्य सूत्रधार मात्र पसार झाले होते. पोलिस त्यांचा कसून शोध घेत होते. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा अवलंब करून त्यांना मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून अटक केली आहे. समीर रंगरेज, सोनू उर्फ शारिक रंगरेजव जावेद रंगरेज रा. एकता नगर परिसर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
माळीपुरा परिसरात पंकज बन्सीलाल भंडारी यांचे नवकार फर्निचर या नावाने दुकान आहे. अनेक वर्षांपासून या जागेचा वाद सुरु आहे. जागेचा ताबा मिळविण्याकरिता जागा मालक प्रयत्न करीत आहे, तर जागेवर अनेक वर्षांपासून दुकान असल्याचे कारण सांगून दुकानदार जागेचा ताबा सोडायला तयार नाही. दोघेही मालमत्तेवर दावा करीत असल्याने प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचले. दोनही पक्षकारांची अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरु आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना समीर रंगरेज याने बेकायदेशीरपणे दुकानावर जेसीबी चालविला. किंमती वस्तू व साहित्याने भरलेलं दुकान क्षणात जमीनदोस्त केलं. रात्रीच्या अंधारात हा खेळ करण्यात आला. पहाटे ही खळबळजनक घटना उघडकीस आली. पंकज भंडारी यांनी या प्रकरणाची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. जवळपास १८ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं पंकज भंडारी यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. सोन्याचांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरीला गेल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवीत जेसीबी ऑपरेटर व काही जणांना अटक केली. पण मुख्य सूत्रधार मात्र पसार झाल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात होता. अशातच त्यांचं लोकेशन मिळाल्याने त्यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या तपासातून आरोपी पोलिसांना गवसले. ठाणेदार अजित जाधव यांनी पीएसआय सुदाम आसोरे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाला छिंदवाडा जिल्ह्यात पाठविले. पोलीस पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात आधी अटक केलेल्या आरोपींना १६ ऑक्टोबर पर्यंत पीसीआर मिळाला आहे. समीर रंगरेज, शारिक रंगरेज व जावेद रंगरेज यांच्यासह सर्व आरोपींवर भादंवि च्या कलम ४५७, ३८०, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
No comments: