प्रशांत चंदनखेडे वणी
तारुण्यात पदार्पण करताच मुलामुलींमध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होऊन त्यांच्यात प्रेमभाव जगतो. अजाणत्या वयात ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मनाची गुंतागुंत वाढली की, कठोर निर्णय घेतले जातात. कुटुंबियांकडून आपल्या प्रेमाला विरोध होईल, व आपली ताटातूट होईल ही मनातील घालमेल त्यांना चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते. निर्णय पेलण्याची क्षमता व आव्हानांना सामोरे जाण्याचं वय नसतांना प्रेमाच्या नात्यात गुरफटून भाव विश्व शोधणारी तरुणाई कळत न कळत आपल्या आयुष्याची धूळधाण करू लागली आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच प्रेमाचं वेड लागलेल्या एका तरुण जोडप्याने प्रेम विवंचनेतून एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही व्ह्रदयद्रावक घटना आज ५ ऑक्टोबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास झरी जामणी तालुक्यातील माथार्जुन शेतशिवारात उघडकीस आली. कोडपाखिंडी येथे एका विवाहित प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आज तरुण प्रेमी युगुलाने एकाच झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. प्रेमी युगुलांच्या एका पाठोपाठ घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी झरी तालुका हादरला आहे.
रोहित मदन मेश्राम (२३) व रंजना नंदू टेकाम (१९) या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम. ते दोघेही प्रेमबंधनात अडकले. सोबत जगण्यामरण्याचा निर्धार केल्यापर्यंतचं त्यांचं प्रेम. रोहित मेश्राम हा शेतकरी कुटुंबातील मेहनती तरुण. तो वडिलांना शेतीत हातभार लावायचा. पण तारुण्यात पदार्पण करताच त्याला प्रेमाचा अविष्कार घडला. तो एका तरुणीच्या प्रेमात पडला. तरूणीचंही त्याच्यावर जीवापाड प्रेम. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. कुटुंबीयांनी प्रेमाला विरोध केल्यास त्यांना दुरावा सहन होणार नव्हता. त्यामुळे त्या दोघांनी प्रेम विवंचनेतून एकत्र आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. ४ ऑक्टोबरला वडिलांबरोबर शेतातून आल्यानंतर रोहित रात्री कुटुंबासोबत झोपला. पण सकाळी वडिलांना तो झोपलेल्या ठिकाणी आढळून आला नाही. वडील त्याच्याबद्दल चौकशीच करीत होते की त्यांना ही दुःखद वार्ता कळाली. रोहित आणि रंजना हे दोघेही माथार्जुन शेत शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्यात बऱ्याच दिवसांपासून प्रेम संबंध होते. कुटुंबियांना आपले प्रेम मान्य होणार नाही, या विवंचनेत त्यांनी आत्त्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या त्या दोघांनीही विरहाच्या भीतीने टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने दोनही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अशा या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

No comments: