Latest News

Latest News
Loading...

राजूर (कॉ.) येथील दीक्षाभूमीवर आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा भव्य सोहळा, विविध सामाजिक उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील दीक्षाभूमीवर आज ७ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा भव्य सोहळा संपन्न होत आहे. महिला समारोह समिती राजूर (कॉ.) यांच्या विद्यमाने भव्य दिव्य असा हा सोहळा साकार होत असून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या सोहळ्याची महिला समारोह समिती कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. रूढी बंधनात खितपतलेल्या समाजाला बाबासाहेबांनी बुद्धांचा मानवतावादी धम्म दिला. अस्पृश्य म्हणून हिणवलेल्या समाजाचा उद्धार करतांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांच्या जीवनाला सकारात्मक दिशा दिली. प्रज्ञा, शील, करुणेची शिकवण देणारा बुद्धांचा धम्म आचरणात आणून बौद्धिक विकास साधण्याचा मार्ग बाबासाहेबांनी दाखविला. बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून बुद्धांचं तत्वज्ञान अंगिकारण्याचा मूलमंत्र बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिला. बाबासाहेबांनी प्रथा, परंपरांना फाटा देत बुद्धिजीवी समाज निर्माण करण्याचा केलेला संकल्प साकार करण्याकरिता सामाजिक प्रबोधनातुन बुद्धाचं तत्वज्ञान जनमानसात रुजविण्याकरिता महिला पुढाकार घेऊ लागल्या आहेत. धम्म दीक्षेने पावन झालेल्या राजूर (कॉ.) येथे दीक्षाभूमी साकारण्यात आली. येथील दीक्षाभूमी ही मिनी दीक्षाभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. या दीक्षाभूमीवर ६७ वा धमचक्र प्रवर्तन दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शासन आपल्या दारी हा उपक्रम याठिकाणी राबविण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हा शासकीय योजनांच्या माहितीसाठीचा कॅम्प लावण्यात येत आहे. शासनाच्या जनतेसाठी असलेल्या सर्व सुविधा, कल्याणकारी योजना, हक्काच्या योजना, कास्तकारांसाठी, महिलांसाठी, जेष्ठांसाठी, निराधारांसाठी, दिव्यांगांसाठी, उच्च शिक्षणासाठी, रोजगारासाठी, आरोग्यासाठी, घरकुलासाठी असलेल्या योजनांची माहिती याठिकाणी मिळणार आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाचे कॅम्प याठिकाणी लागणार असून शासकीय योजनांची माहिती, आवश्यक दाखले व प्रमाणपत्र याठिकाणी मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता हवी असलेली पूरक माहिती दीक्षाभूमी परिसरात मिळणार असल्याने नागरिकांनी या संधीचं सोनं करून घ्यावं, असं आव्हान आयोजकांनी केलं आहे. 

भव्य असा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा राजूर येथील दीक्षाभूमीवर संपन्न होत आहे. दुपारी १२ वाजता भदंत डॉ. राजरत्न (वर्धा) यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा होणार असून १ वाजता महाथेरो भदंत धम्मसारथी यांचा धम्मदेसना हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ ते ४ या वेळात आरोग्य व मोफत औषधी वाटप शिबीर होणार आहे. याच वेळी भव्य रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान दुपारी २ वाजता थायलंड प्राप्त बुद्ध मूर्तीचं वितरण सन्मान सोहळा तथा परदेशात शिक्षणाकरिता शिष्यवृत्तीच्या संधी यावर मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाला धम्मदूत डॉ. गगन मलिक (सिने अभिनेता, मुंबई) यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजि. पी.एस. खोब्रागडे (नागपूर), १००० विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाकरिता शिष्यवृत्तीच्या संधी उपलब्ध करून देणारे हेमंत सुटे उपस्थित राहणार आहे. सायंकाळच्या सत्रात प्रबोधनातुन ज्ञानात भर पाडणारा कार्यक्रम होणार आहे. जणविख्यात प्रबोधनकार सीमा पाटील यांचा शिव, शाहू, फुले व आंबेडकरी विचारांचा शाहिरी बाणा हा आधुनिक विचारसरणी जनमानसात पेरणारा कार्यक्रम पहायला मिळणार आहे. संगीत, दिग्दर्शक व निर्माता जॉली मोरे यांची बहुजनांसाठी असलेली संगीतमय नाट्यकृती या निमित्ताने पहायला व ऐकायला मिळणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हा सोहळ्याला प्रबुद्ध विचारांचं आकलन करणाऱ्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान महिला समारोह समितीने केले आहे. 

No comments:

Powered by Blogger.