अट्टल गुन्हेगाराने आपला वाढदिवस साजरा करतांना झाडल्या बंदुकीतून गोळ्या, पोलिसांनी त्याला ठोकल्या बेड्या
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील भांदेवाडा गावाजवळील शेतात आपला वाढदिवस साजरा करतांना एका सराईत गुन्हेगाराने चक्क पिस्तुलातून हवेत गोळ्या झाडल्या. भाई म्हणून वावरणाऱ्या या गुन्हेगाराने त्याचा वाढदिवस साजरा करतांना प्रचंड गोंधळ घातला. आपल्या वाढदिवसानिमित्त केक कापताना त्याने पिस्तूलातून दोन राऊंड हवेत फायर केले. वाढदिवसाच्या पार्टीत त्याने केलेल्या उपद्रवामुळे परिसरात एकच खळबळ माजली. शेतात रंगलेल्या वाढदिवसाच्या या पार्टीची नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस तात्काळ वाढदिवसाची पार्टी सुरु असलेल्या शेतात पोहचले. पोलिसांना पाहून तेथील काही युवक सैरावैरा पळत सुटले. परंतु पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून काही जणांना पकडले. त्यातील एका जणा जवळ विदेशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या जवळील अग्निशस्त्र जप्त केले. नंतर तो पोलिसांच्या रडारवर असलेला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
त्याच्या शिरावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो आजवर पोलिसांना गुंगारा देत होता. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत अकांड तांडव करतांना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराने आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत धुमाकूळ घालून परिसरातील शांतता भंग करणाऱ्या तरुणांनाही ताब्यात घेतले. या अट्टल गुन्हेगाराकडून पोलिसांनी विदेशी बनावटीचे पिस्तूल व हवेत फायर केलेले काडतूस जप्त केले आहे. पोलिसांनी या अट्टल गुन्हेगारावर बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही धडक कार्यवाही २८ नोव्हेंबरला पहाटे २ वाजता करण्यात आली.
पोलिस रेकॉर्डवर खून, अपहरण या सारखे गंभीर गुन्हे नोंद असलेला उमेश किशोरचंद रॉय (३०) रा. प्रगती नगर, कोलार पिंपरी, वणी हा मागील एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. एक वर्षा पूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून तुरुंगातून सुटला होता. तो जवळ पिस्तूल बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या रडारवर असलेला हा गुन्हेगार शहरात मोकाट फिरत होता. तो भाईगिरीतून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत होता. २७ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस असल्याने त्याने भांदेवाडा लगत असलेल्या कश्यप याच्या शेतात वाढदिवसाची पार्टी आयोजित केली. अनेक जण या भाईचा वाढदिवस साजरा करण्याकरिता पार्टीत सहभागी झाले. शेतात डीजे लावून मोठ्या आवाजात गाणी वाजविण्यात आली. मद्यधुंद तरुण डीजेवर बेधुंद होऊन नाचले. वाढदिवसाचा केक कापताना उमेश रॉय या गुन्हेगाराने चक्क आपल्या जवळील विदेशी बनावटीच्या पिस्तूल मधून हवेत दोन राऊंड फायर केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाचा वाढदिवस असल्याची चर्चा सर्वत्र पसरली. त्यामुळे लोकही चांगलेच धास्तावले. बंदुकीतून हवेत गोळ्या झाडून वाढदिवस साजरा करण्यात येत असल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारी क्षेत्रातील या भाईच्या वाढदिवसाचा धिंगाणा सुरु असल्याने ही माहिती ठाणेदार अजित जाधव यांच्या कानावर आली. त्यांनी लगेच सपोनि दत्ता पेंडकर यांच्या नेतृत्वात त्याठिकाणी पोलिस पथक पाठविले. पोलिसांना पाहून मद्यधुंद होऊन डीजेवर नाचणारे काही लोकं पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून उमेश रॉय देखील पळाला. पण पोलिसांनी त्याचा देखील पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांना त्याच्या जवळ विदेशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. त्याला पिस्तूल बाबत विचारले असता त्याने वाढदिवस साजरा करण्याकरिता पिस्तूल आणल्याचे सांगितले. तसेच पिस्तूल मधून दोन राऊंड हवेत फायर केल्याचेही त्याने कबुल केले. पिस्तूल जवळ बाळगण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसतांना बेकायदेशीरपणे पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या उमेश रॉय या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ ,७, २५, २७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी जवळून विदेशी बनावटीची स्टीलची पिस्तूल जप्त केली आहे. शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागली असून गुंड प्रवृत्तीचे लोक जवळ शस्त्र बाळगत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यांच्या जवळ हे शस्त्र कुठून व कसे येतात हा चिंतनाचा विषय बनला आहे. परंतु पोलिसांच्या या धडक कार्यवाहीने अपप्रवृतीच्या लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, मारेगावचे ठाणेदार सपोनि जनार्धन खंडेराव, सपोनि दत्ता पेंडकर, सफौ. सुदर्शन वानोळे, पोना पंकज उंबरकर, संतोष आढाव, अमोल अन्नेलवार, अविनाश बनकर, पोकॉ विशाल गेडाम, श्याम राठोड, मो. वसिम, पुरुषोत्तम डडमल, गजानन कुडमेथे निरंजन खिरडकर यांनी केली.


No comments: