नैसर्गिक आपत्तीने विवंचनेत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांवर निसर्गाने पाणी फेरले. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यामुळे बळीराजा नैराश्येच्या गर्तेत आला आहे. शेतपिकांची वाताहत झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची हिरवीगार स्वप्न मातीमोल झाली. नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय काँग्रेस कमिटी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
काळ्या मातीत घाम गाळून कष्टाने रान हिरवं करणारा शेतकरी नेहमी संकटाने घेरलेला असतो. संकटाशी शेतकऱ्यांचं एकप्रकारे नातंच जुळलं आहे. जीवाचं रान करून शेतात मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा होणं हा नित्यनियमच झाला आहे. कधी उगविलेली पिकं निसर्ग नेस्तनाभूत करतो, तर कधी डौलणाऱ्या पिकांची नासाडी करतो. नौसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची नेहमीच दैना झालेली पहायला मिळते. हिरवीगार स्वप्न डोळ्यात साठवून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर निसर्गाचं भयावह रूप येतं. शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचं काम नेहमीच निसर्गानं केलं आहे. शेतीची मशागत, मजुरांचा खर्च, शेत पिकांचं संगोपन, पेरणी, डवरण, कापणी, फवारणी, बी-बियाणं, खतं आणि कास्तकाराची जीवतोड मेहनत हा हिशोब बघता त्याला नुकसानीपोटी मिळणारी रक्कम अगदीच तुटपुंजी असते. त्यामुळे त्याच्या चिंता टोकाची भूमिका घेतात. कुटुंबाची भरण पोषणाची जबाबदारी पेलताना हताश झालेलं मन विवंचना निर्माण करतं. कौटुंबिक गरजा भागवू न शकल्याने कुटुंबियांशी डोळे मिळविताना निर्माण होणारी संकुचित भावना कास्तकाराला अस्वस्थ करून सोडते. कधी तरी परिस्थिती सुधारेल या आशेवर संकटाचा सामना करतांना जेंव्हा धैर्य तुटतं, तेंव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो. निसर्गाची अवकृपा आणि आश्वासनांचा पाऊस हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलं आहे. आश्वसनांच्या हिंदोळ्यावर शेतकऱ्यांना झुलवणं ही नीतिमत्ताच होऊन बसली आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याची आश्वासने कधी तरी पूर्णत्वास येतील काय, ही उद्विग्नता आजही कायम आहे.
यावर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची हाताशी आलेली पिकं उध्वस्त केली. निसर्गाचा लहरीपणा कास्तकारांच्या पथ्यावर पडला आहे. शेत पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे. शेतीच्या मशागतीचा खर्च प्रचंड वाढला असला तरी शेत मालांना शासनाकडून समाधानकारक भाव मिळतांना दिसत नाही. त्यामुळे कास्तकार चांगलंच अडचणीत सापडला आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटात तो घेरला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. वन विभागानेही शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचं काम केलं आहे. रान डुकरं व रोह्याचे कळप उभ्या शेत पिकांची नासाडी करीत आहेत. रान डुकरं व रोहयांनी शेतात धुडगूस घालून शेत पिकांची प्रचंड हानी केली. शेतकऱ्यांनी वन विभागाला वन्य जीवांचा बंदोबस्त करण्याकरिता वारंवार निवेदने दिली. पण वन विभागाने मात्र उदासीनता दर्शविली. वन्य प्राण्यांमुळेही शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती व वन्य प्राण्यांमुळे शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेसच्या वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने एसडीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतांना काँग्रेसचे टीकाराम कोंगरे, प्रमोद वासेकर, संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, प्रफुल उपरे, रामचंद्र वाभीटकर, ज्ञानेश्वर बेलेकर, मारोतराव पाचभाई, अरविंद बोबडे, साधनाताई गोहोकार, शारदा ठाकरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment