मस्ती, उन्माद व अहंकारी प्रवृत्तीतून पेटली संघर्षाची ठिणगी, वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये फिश खाण्यावरून तुफान राडा
प्रशांत चंदनखेडे वणी
मस्ती, उन्माद आणि अहंकारी प्रवृत्तीतून एकमेकांवार कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात मानवी संघर्ष उफाळतांना दिसत आहे. ऍटिट्यूड व इगोमुळे माणूस माणसाचा वैरी होत चालला आहे. माणसाच्या संवेदना व त्यांच्यातील संवेदनशीलता लोप पावत चालली आहे. माणूसच माणसाच्या जीवावर उठल्याचे चित्र आज सर्वत्र पहायला मिळत आहे. शुल्लक कारणावरून एकमेकांवर आघात करणारी मानवी प्रवृत्ती मानवी संकल्पनेला बाधक ठरू लागली आहे. माणसाला माणसाविषयीच चीड निर्माण झाली आहे. मनुष्य आक्रमक प्रवृत्तीचा झाला आहे. माणसाच्या या आक्रमक प्रवृत्तीमुळेच मानवी संघर्षाची ठिणगी पेटू लागली आहे. शुल्लक कारणावरून मानवी संघर्ष उफाळल्याची अशीच एक घटना राजूर येथे घडली. एकाच क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये ३० नोव्हेंबरला झालेला राडा मनुष्यातील आक्रमकता दर्शविणारा ठरला आहे.
वेकोलिच्या भांदेवाडा (राजूर) कोळसाखाणीत सुरक्षा सप्ताह सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे धडे देण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणांवरून वेकोलिचे अधिकारी भांदेवाडा कोळसाखाणीत आले आहेत. भांदेवाडा कोळसाखाणीतील सुरक्षेची पाहणी व कर्मचाऱ्यांना सुरक्षेबद्दल माहिती दिल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी सायंकाळी ६ वाजता पोस्टल ग्राउंड येथे जेवणासाठी जमले. जेवण करतांना मासोळीचे तळलेले पीस खाण्यावरून वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नंतर वाद विकोपाला गेला, आणि त्यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. काही क्षणातच वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला. एकमेकांचे जेवणाचे ताट फेकण्यात आले. त्यातच एका वेकोलि कर्मचाऱ्याने दुसऱ्या वेकोलि कर्मचाऱ्याच्या डोक्यावर गरम झारा मारल्याने त्याचे डोके फुटले. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने तेथे उपस्थित असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मनोज विधाते (२९) रा. राम शेवाळकर परिसर या वेकोलि कर्मचाऱ्याने झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी श्रीकांत मिलमिले (३०) रा. कोना व महेश जुनगरी (३०) या दोघांवर भादंवि च्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये फिश खाण्यावरून झालेला राडा वेकोलि वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

No comments: