नैराश्येतून आणखी एका युवकाने केला जीवनाचा शेवट, राहत्या घरीच घेतला विषाचा घोट
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी उपविभागात आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं असून एकापाठोपाठ एक होणाऱ्या आत्महत्यांनी उपविभाग हादरला आहे. जीवनात आलेलं नैराश्य व खचलेल्या मानसिकतेतून मृत्यूला कवटाळलं जात असून नैराश्यवादी दृष्टिकोनातून आत्महत्या होऊ लागल्या आहेत. नागरिकांमध्ये जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता प्रशासकीय स्तरावर कुठल्याही प्रकारची समुपदेशन शिबिरं घेतली जात नाही. निराशावादी विचारसरणी नागरिकांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू लागली असून नागरिकांमध्ये जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांचे मनोबल वाढविणारे कुठलेही उपक्रम हाती घेतले जात नसल्याने नैराशेच्या काळोखात जीवन गडप होऊ लागलं आहे. खचलेल्या मानसिकतेतून आणखी एका युवकाने मृत्यूला कवटाळल्याची घटना मारेगाव पोलिस स्टेशनतर्गत येणाऱ्या सुर्ला या गावात घडली. जीवनात आलेल्या नैराश्येतून त्याने जीवनालाच पूर्ण दिला. राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून त्याने आत्महत्या केली. अजय नामदेव कोडापे (३४) रा. सुर्ला ता. झरी असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
सुर्ला या गावात परिवारासह वास्तव्यास असलेला अजय कोडापे हा कास्तकार असल्याचे सांगण्यात येते. अजय आणि त्याचा भाऊ हे दोघेही शेती वाहायचे. अजय हा विवाहित असून त्याचे नुकतेच लग्न झाले होते. आज ११ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब घरी असलेल्या त्याच्या आईच्या निदर्शनास येताच आईने आरडाओरड केली. आईचे किंचाळणे ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. अजय कोडापे याने विष प्राशन केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या अजयला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असतांना काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंब मात्र पुरतं हादरलं आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजय कोडापे याच्या अशा या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. शवविच्छेदानंतर त्याचा मृतदेह अंतिमसंस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. घटनेचा प्राथमिक तपास जमादार पुरुषोत्तम डडमल तर पुढील तपास मारेगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment