शेतकऱ्यांना सात दिवसात नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन, विजय पिदूरकर यांनी दिला निर्वाणीचा इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी
कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे धूळ प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून प्रमुख रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसते. कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे उडणारी धूळ शेत पिकांसाठी हानिकारक ठरत असून कोळशाच्या काळ्या धुळीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. धुळीमुळे शेत जमीनही प्रभावित होऊ लागली आहे. दिवस रात्र कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे सतत उडणारी धूळ रस्त्यालगतच्या शेतांमध्ये जमा होऊन जमिनीची सुपीकता घटू लागली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मागील चार महिन्यांपासून सातत्याने केली जात असतांनाही प्रशासन या मागणीला गांभीर्याने घेतांना दिसत नाही. वेकोलीमुळे शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सात दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मुंगोली, कोलगाव व पैनगंगा कोळसाखाणीतून साखरा, शिंदोला, शिरपूर मार्गे घुग्गुस व वणी कोळसा सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरु असते. कोळसा वाहतुकीचे शेकडो ट्रक या मार्गाने सुसाट धावतांना दिसतात. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून हा मार्ग कोळसा खदानीतील रस्त्याप्रमाणे झाला आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांमधून खाली पडणाऱ्या कोळशावरून जाणे येणे करणाऱ्या वाहनांमुळे त्या कोळशाची भुकटी तयार होते. आणि रस्त्याने धावणाऱ्या वाहनांमुळे ती सतत उडत असते. या मार्गाने मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक केली जात असल्याने हा मार्ग नेहमी धुळीने व्यापलेला असतो. या धुळीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. रस्त्यालगत शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांची पिकं या धुळीमुळे उध्वस्त झाली आहेत.
कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे धुळीची समस्या निर्माण झाली असून या धुळीने कोलगाव, साखरा, शिवणी, येनक, येनाडी, शेवाळा, शिंदोला, कुर्ली या आठ गावातील शेतकऱ्यांच्या शेत पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. याबाबत वेकोलि प्रशासनाला वेळोवेळी अवगत करूनही वेकोलि प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिले नाही. वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे वेकोलिचे मुजोर अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने शेतकरी व गावकऱ्यांना अनेकदा रस्ता रोको आंदोलनं करावी लागली. प्रशासनालाही वारंवार निवेदने देण्यात आली. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही देण्यात आले. पण नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना अद्याप दमछाकही मिळालेला नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन व वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांचे बोळवण करीत असल्याचे दिसून येत आहे.
वारंवार आंदोलने करण्याने अनेकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. पण प्रशासन मात्र आपले वेळकाढू धोरण बदलायला तयार नाही. कृषी अधिकाऱ्यांनी आपला अहवाल दिला असतांनाही प्रशासन कास्तकारांना नुकसान भरपाई देण्याकरिता दिरंगाई करीत आहे. विजय पिदूरकर यांनी सतत या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. १० नोव्हेंबरला निवेदन देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत प्रशासनाला अवगतही केले होते. परंतु तरीही प्रशासनाने संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली असून सात दिवसात जर शेतकऱ्यांना शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळाला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा नेते व माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देते वेळी विजय पिदूरकर यांच्या सोबत नुकसाग्रस्त कास्तकार उपस्थित होते.

No comments: