प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा आज शहरात कीर्तनाचा भव्य कार्यक्रम
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्रातील विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनातून समाज प्रबोधन करणारा कार्यक्रम वणी येथे आयोजित करण्यात आला आहे. गुरुदेव अर्बन नागरी सहकारी पतसंस्था व रेणुका इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज १३ डिसेंबरला शासकीय मैदान (पाण्याची टांकी) येथे सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकांनी चांगल्या विचारांचे आचरण करावे तथा समाजात वावरतांना लोकांनी चांगली वागणूक ठेवावी, याचा पाठ ते आपल्या कीर्तनातून गिरवतात. समाजातील कुप्रथांवर आपल्या विनोदी शैलीत ते शब्दांचा मारा करतात.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे मूळ गाव. या गावाच्या नावावरूनच त्यांचं इंदुरीकर महाराज हे नाव पडलं. निवृत्ती काशिनाथ देशमुख हे नंतर इंदुरीकर महाराज म्हणून नावारूपास आले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडविण्याचं काम केलं. विनोदी कीर्तनकार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. तरुणांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या कीर्तनाने वेड लावलं आहे. कीर्तनाची एक वेगळीच तऱ्हा त्यांनी समाजापुढे मांडली आहे. कुटुंबातील वागणुकीपासून तर समाजातील वागणुकीपर्यंतचं प्रबोधन त्यांच्या कीर्तनातून ऐकायला मिळतं. अशा या प्रख्यात कीर्तनकाराचं कीर्तन प्रत्येक्षात ऐकण्याचं भाग्य वणीकरांना लाभलं आहे. १३ डिसेंबरला भव्य शासकीय मैदानावर त्यांचा भन्नाट कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा वणी उपविभागातील जनतेने सहकुटुंब लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे. या कर्यक्रमाकरिता वाहनांच्या पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा हास्य फुलोरे उडविणारा कीर्तनाचा कार्यक्रम याच देही त्याच डोळा पाहण्याची संधी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे कीर्तन ऐकण्याकरिता जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment