अवैध दारू विक्रेत्याच्या घरातून देशी दारूचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडक कार्यवाही
प्रशांत चंदनखेडे वणी
अवैध दारू विक्री करीता राहत्या घरी देशी दारूचा साठा करून ठेवणाऱ्या एका अवैध दारू विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दारूच्या साठ्यासह ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही आज १४ डिसेंबरला मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सराटी या गावात करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे फोफावू लागले असतांनाही पोलिस मात्र हितसंबंध जोपासण्याला महत्व देत असल्याने अवैध व्यावसायिक बिनधास्त झाले आहेत. पोलिसांच्या मधुर संबंधामुळे अवैध व्यवसायाला चांगलीच तेजी आली आहे. पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरु असतांनाही पोलिस मात्र अजाणतेपणाचं पांघरून ओढून आहेत. अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होऊ लागल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाला पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती मिळवून कार्यवाहीचा बडगा उगारावा लागत आहे.
यवतमाळ गुन्हे शाखा पथक मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता तसेच फरार आरोपींचा शोध लावण्याकरिता पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत असतांना त्यांना सराटी या गावात एका अवैध दारू विक्रेत्याने आपल्या राहत्या घरी देशी दारूचा अवैधरित्या साठा करून ठेवल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा पथकाने सराटी या गावातील विवेक नरांजे याच्या घरी धाड टाकून त्याच्या घराची कायदेशीररित्या झडती घेतली असता गुन्हे शाखा पथकाला त्याच्या घरातील स्वयंपाक खोलीच्या बाजूला असलेल्या खोलीत देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. गुन्हे शाखा पथकाने त्याच्या घरातून देशी दारूचे एकूण १४ बॉक्स जप्त केले. या १४ बॉक्समध्ये देशी दारूच्या १८० मिलीच्या ६७२ शिश्या होत्या. गुन्हे शाखा पथकाने घटना स्थळावरून ४६ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विवेक नरहरी नरांजे (३९) रा. सराटी या अवैध दारू विक्रेत्याला अटक केली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र दारू बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्था.गु.शा. चे पो.नि. आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, पोलिस अमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी केली.
Comments
Post a Comment