नैराश्येतून आणखी एका तरुणाने मृत्यूला कवटाळले, राहत्या घरीच घेतला गळफास
प्रशांत चंदनखेडे वणी
सतत होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला असून एकापाठोपाठ एक आत्महत्या होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज आणखी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शास्त्री नगर येथे घडली. शास्त्री नगर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या जीवनाचा शेवट केला. अनिकेत विजय आवारी (२१) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून आज आणखी एका तरुणाने नैराश्येतून मृत्यूला कवटाळले आहे. शास्त्री नगर येथील अनिकेत आवारी या तरुणाने आज १२ डिसेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरी कुणी नसतांना त्याने गळफास घेतला. त्याची आई कामावरून घरी आल्यानंतर तिला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तिने एकच हंबरडा फोडला. तरुण मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंकित हा सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचा तरुण होता. त्याचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते. त्याने गळफास घेतल्याचे कळताच परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शीघ्र घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपासातून ते लवकरच समोर येईल. पण तरुण मुलाने आत्महत्येसारखा पर्याय निवडल्याने कुटुंबं पुरतं हादरलं आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment