वणी वरोरा मार्गावर धावती कार पेटली
प्रशांत चंदनखेडे वणी
चालत्या कारला अचानक आग लागून संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी चढल्याची खळबळ जनक व हृदयाचा थरकाप उडविणारी घटना आज २० डिसेंबरला सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील एका पेट्रोलपंप समोर घडली. अगदीच पेट्रोलपंप जवळ अचानक या कारने पेट घेतला, व क्षणात संपूर्ण कारला आगीने आपल्या कवेत घेतले. धु-धु करत संपूर्ण कार जळाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दल अगदी वेळेतच घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आगीची धग शमविली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून पेटती कार विझविल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तांत्रिक बिघाडीमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कार मधून धूर निघू लागताच प्रसंगावधान राखून कार मालक कारमधून बाहेर पडल्याने अनुचित प्रकार टळला.
राजुरा येथील रहिवासी असलेला शानू शेख हा कार दुरुस्तीकरिता वणीला येत होता. दरम्यान वजन काट्याजवळ असलेल्या पेट्रोलपंप समोर चालत्या कारने अचानक पेट घेतला. क्षणातच आग भडकली, व कारला आपल्या कवेत घेतले. धु-धु करत संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी चढली. जवळच पेट्रोलपंप असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असतांनाच अग्निशमन दलाने वेळेत पोहचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनाही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेने कार मालक शानू शेख मात्र चांगलाच धास्तावला आहे. कारची दुरुस्ती करण्याकरिता तो कार घेऊन वणीला आला होता. पण गॅरेज पर्यंत पोहचण्याआधीच कारने पेट घेतला, व संपूर्ण कार जळून खाक झाली.
Comments
Post a Comment