धूळ प्रदूषणाने आलं मानवी जीवन धोक्यात, शेत पिकांचंही होऊ लागलं अतोनात नुकसान, याकडे लक्ष देण्याची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील कोळसाखानी, सिमेंट कंपन्या, चुना भट्टे, खनिजांवर आधारित उद्योग व कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागल्याने मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. धूळ प्रदूषणामुळे शेत पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आहे. खनिज उत्पादक कंपन्या व उद्योगांचं प्रदूषण नियंत्रणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होऊ लागल्याने प्रदूषणाने उचांकी पातळी गाठली आहे. तालुक्यात कुठेही प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात आलेले नाही. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ कागदी घोडे नाचवितांना दिसत आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या कंपन्या व उद्योगांना नियम लावण्यात प्रशासन उदासीनता दर्शवित असल्याने खनिज उत्पादन कंपन्या व उद्योजकांची मनमानी वाढली आहे. प्रदूषण रोखण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपायोजना केल्या जात नसल्याने प्रदूषित वातावरणात जीवन जगतांना येथील नागरिकांचा श्वास गुदमरू लागला आहे. वेकोलिच्या कोळसाखानी, खनिज उत्पादक कंपन्या व खनिजांवर आधारित उद्योगांमुळे प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या या तालुक्याला काळी नगरी ही उपमा देण्यात आली आहे. धूळ प्रदूषणामुळे मानवी आरोग्य व शेतीचा ऱ्हास होऊ लागला असून तालुक्यातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांनी एसडीओ मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

वणी तालुका हा खनिज संपन्न तालुका असून शासनाला प्रचंड महसूल मिळवून देणारा हा तालुका आहे. तालुक्यात कोळसाखानी, गिट्टी क्रेशर, चुना भट्टे, खनिज उत्पादक कंपन्या, सिमेंट कंपन्या, लाइमस्टोन व डोलोमाइटच्या खदानी मोठ्या प्रमाणात आहेत. तालुक्यात गौण खनिजांचं प्रचंड उत्खनन व उत्पादन होत असल्याने याठिकाणी खनिजांवर आधारित अनेक उद्योग, कंपन्या व कारखाने उभारण्यात आले आहेत. ही तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असली तरी प्रदूषणामुळे हा तालुक्यासाठी अभिशाप ठरू लागला आहे. औद्योगिक क्षेत्राचं प्रदूषण नियंत्रणाकडे कमालीचं दुर्लक्ष होऊ लागलं आहे. प्रदूषण ओकणाऱ्या कोळसाखानी, कोळसा सायडिंग, चुना भट्टे, गिट्टी क्रेशर व खनिज उत्पादक कंपन्या माणसाचं आयुष्य कमी करू लागल्या आहेत. प्रदूषणामुळे येथील नागरिकांना अनेक गंभीर आजार जडले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे येथील नागरिक आता आपले बस्तान हलवू लागले आहेत. शेतकरीही प्रदूषणामुळे हवालदिल झाले आहेत. धूळ प्रदूषणामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान होऊ लागलं आहे. सतत उडणाऱ्या धुळीमुळे शेतीची सुपीकता व शेत मालांची प्रतवारी देखील घटू लागली आहे. शेत पिकं पूर्णतः उद्धवस्त होऊ लागली आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाकडे लक्ष देणं आता अति जरुरीचं झालं आहे. 

वणी तालुक्यात ९ कोळसाखानी आहेत. या कोळसाखाणींमधून सतत कोळशाची वाहतूक सुरु असते. मुख्य रस्त्यांवरून शेकडो ट्रक दिवसरात्र कोळशाची वाहतूक करतांना दिसतात. कोळसा व खनिजांच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून नव्याने बांधलेले रस्तेही उखडू लागले आहेत. तालुक्यातील एसीसी सिमेंट कंपनीही प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरू लागली आहे. शहरापासून जवळच असलेल्या राजूर (कॉ.) येथे अनेक चुना भट्टे आहेत. त्यापैकी ६ चुना भट्टे नियमित सुरु आहेत. या चुना भट्ट्यांमधून निघणाऱ्या धुळीने परिसरात नेहमी पांढरं धुकं पसरलेलं दिसतं. मोहदा येथे २२ गिट्टी क्रेशर असून या गिट्टी क्रेशरमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होत आहे. गिट्टी खदानींमधून मोठ्या आकाराची गिट्टी ट्रकच्या माध्यमातून प्लांटवर आणून ती बंकरमध्ये खाली करण्यात येते. नंतर ती क्रेशरमध्ये बारीक होऊन बाहेर पडते. ही प्रक्रिया होत असतांना वाऱ्यासारखी धूळ उडते. संपूर्ण परिसर धुळीने व्यापला जातो. पण याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. धूळ प्रदूषणामुळे नागरिकांचं श्वास घेणं कठीण झालं आहे. धूळ प्रदूषणाने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचं आयुष्यमान घटू लागलं आहे. शेत पिकांवर धूळ बसून उभी पिकं नेस्तनाबुत होत असल्याने शेतकरीही संकटात आला आहे. कोळसा व खनिजांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचीही मोठी दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली असून शासन व प्रशासनाने वेकोलिच्या कोळसाखानी, खनिज उत्पादक कंपन्या, खनिजांवर आधारित उद्योग व प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखान्यांवर प्रदूषण प्रतिबंधात्मक नियम लावण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी