सरपंच नागोराव धनकसार यांना अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आयुक्तांनी दिली स्थगिती

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील कायर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेऊन अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अमरावती आयुक्तालयाने स्थगिती देऊन त्यांना सरपंचपदी कायम ठेवल्याने विरोधकांची व्यूहरचना कुचकामी ठरली आहे. कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागोराव धनकसार यांच्या विरुद्ध रचलेली कटकारस्थानं आयुक्तांच्या स्थगितीच्या आदेशाने धुळीस मिळाली आहे. नागोराव धनकसार यांना सरपंच पदावरून हटविण्याकरिता विविध युक्त्या व शक्कली लढविण्यात आल्या. त्यांचे सरपंच पद घालविण्याकरिता मोर्चे बांधणीही करण्यात आली. त्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या ताकदीने तक्रारी करण्यात आल्या. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचून नागोराव धनकसार यांना अपात्र ठरविण्याची मागणी रेटून धरण्यात आली. अखेर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविले. पण त्यांनी वेळीच अमरावती आयुक्तालयात धाव घेतली, व आयुक्तांकडे रीतसर अपील केली. आयुक्तांनी अपीलधारकाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून तथा सत्यता पडताळून जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला २१ डिसेंबरला स्थगिती दिली. त्यामुळे नागोराव धनकसार हे आता सरपंच पदावर कायम राहणार आहेत. 

गावपातळीवर सरपंच पदाकरिता नेहमीच रस्सीखेच पहायला मिळते. गावचा सरपंच होण्याकरिता सर्वोतपरी प्रयत्न केले जातात. गावात सरपंचाला मोठा मान असतो. सरपंच पद हे राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचं मानल्या जात असल्याने राजकीय पुढारी सरपंच होण्याकरिता पूर्ण ताकद लावतात. पण शेवटी पसंती ही जनता देत असते. कायर ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांना मोठा हादरा बसला. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतरही नागेश धनकसार यांनी जनतेचा विश्वास जिंकला. अपक्ष निवडणूक लढवूनही ते सरपंच झाले. ही सल दिग्गजांच्या मनात कायम राहिली. निवडणुकीनंतरही त्यांच्या विरोधात टोकाचं राजकारण करण्यात आलं. त्यांना चक्रव्यूहात अडकविण्याकरिता अनेक डावपेच आखण्यात आले. पण विरोधकांचे सर्वच मनसुबे असफल ठरल्यानंतर त्यांच्यावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या ताकदीने तक्रारी करून त्यांना अपात्र घोषित करण्यापर्यंत पराकोटीचे प्रयत्न करण्यात आले. त्यांचा अपात्रतेचा आदेश निघताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पण ते म्हणतात ना कितीही कुटील डाव रचले तरी विजय हा सत्याचाच होतो, हाच प्रत्यय यावेळी देखील आला. नागोराव धनकसार यांनी अमरावती आयुक्तालयाचा दरवाजा खटखटला, आणि बाजीच पालटली. विरोधकांचे सर्वच मनसुबे उधळले गेले. आयुक्तांनी नागोराव धनकसार यांच्या अपात्रतेलाच स्थगिती दिली.  

सन २०२०-२०२१ या काळात झालेल्या कायर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागोराव धनकसार यांचं पॅनल विजयी झालं. त्यांची सरपंच पदावर एकमताने निवड करण्यात आली. परंतु विरोधकांना पराभव पचनी पडला नाही. त्यांनी नागोराव धनकसार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. म. रा. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६(२) नुसार शासकीय जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी नागोराव धनकसार यांना अपात्र ठरविण्याची मागणी विरोधकांनी रेटून धरली. त्यानुसार त्यांना जिल्हाधिकारी यांनी ग्रा.प. सदस्य पदावरून अपात्र घोषित केले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध नागोराव धनकसार यांनी वकिलांमार्फत अमरावती आयुक्तालयात अपील केली. अतिक्रमित जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले नसल्याचा युक्तिवाद वकिलांकडून करण्यात आला. नागोराव धनकसार रहात असलेली मालमत्ता त्यांच्या आईच्या नावे आहे. ज्या जागेवर बन्सी धनकसार यांनी अतिक्रमण केले होते, ती जागा ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली आहे. आयुक्तांनी अपीलधारकाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून तथा सत्यता पडताळून २१ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिली. आयुक्तांच्या आदेशामुळे नागोराव धनकसार यांचं सदस्यत्व अबाधित राहणार असून ते सरपंच पदी कायम राहणार आहेत. नागोराव धनकसार यांच्याकडून ऍड. अरविंद गुडदे यांनी युक्तिवाद केला. शेवटी अखिल भारतीय सरपंच संघटना व सरपंच धनकसार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. त्यांना कायर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्यांनी देखिल मोलाचे सहकार्य केले. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी