सुशगंगा पब्लिक स्कुलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा
प्रशांत चंदनखेडे वणी
स्वावलंबी शिक्षण संस्थेद्वारा संचालित सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन अंतर्गत सुशगंगा पब्लिक स्कुल येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने सुशगंगा पब्लिक स्कुल येथेही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गणित दिवसाचे औचित्य साधून शाळेत गणित प्रदर्शनी घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य प्रविण दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. तर शाळेचे संस्थापक प्रदीप बोनगिरवार व व्यवस्थापकीय संचालक मोहन बोनगिरवार हे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्यात भर पडावी तथा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा म्हणून सुशगंगा पब्लिक स्कुलमध्ये विविध बौद्धिक कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गणित दिवस उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गणित प्रदर्शनी देखील घेण्यात आली होती. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी भूमितीय आकार व तिसरीतील विद्यार्थ्यांनी त्रिकोणमितीवर आधारित प्रतिकृती तयार केल्या. शाळेचे संस्थापक प्रदीप बोनगिरवार व व्यवस्थापकीय संचालक मोहन बोनगिरवार यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचे कौतुक केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रविण दुबे यांनी गणित तज्ज्ञ रामानुजन यांचे गणित क्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्याचे सांगतानाच हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अभिमाचा दिवस असल्याचे मनोगत व्यक्त केले.
गणित प्रदर्शनीचे आयोजन नुरसायमा खान, मुस्कान शेख, व आलिया शेख या शिक्षकांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी स्कुल हेड बॉय कृष्णा बिजवे या विद्यार्थ्याने आपल्या जीवनातील गणिताचं महत्व अतिशय उत्तमरीत्या पटवून दिलं. त्याने जीवनातील गणिताची परिभाषा सांगतांना म्हटले की, झोपेतून उठले की आपले लक्ष घड्याळाकडे जाते, आणि तेथूनच गणित सुरु होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणित वापरावं लागतं. दैनंदिन जीवनात सकाळ पासून तर सायंकाळपर्यंत सर्वच गणिताच्या व्याख्या वापरतात. आणि म्हणूनच गणित हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment