शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबेना, एका पाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने झरी तालुका हादरला
प्रशांत चंदनखेडे वणी
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्याने तालुका हादरला आहे. आमलोन या गावातील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला काही तासांचा अवधी लोटत नाही तोच डोंगरगाव येथील शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने तालुक्यात चिंतेचं वातावरण पसरलं झालं आहे. मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतच या दोन्ही आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरीच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १९ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. बाबाराव विठ्ठल डोहे (५३) असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
झरी जामणी तालुक्यातील डोंगरगाव येथे वास्तव्यास असलेल्या बाबाराव डोहे या शेतकऱ्याने घरी कुणी नसतांना विषारी द्रव्य प्राशन करून मृत्यूला कवटाळले. मृत्तक बाबाराव यांची पत्नी शेतातून घरी परतल्यानंतर तिला बाबाराव हा कुठलीही शारीरिक हालचाल न करता जमिनीवर पडून दिसला. पत्नीने त्याच्या जवळ जाऊन बघितले असता तिला त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडतांना दिसला. पतीची ही अवस्था पाहून ती चांगलीच घाबरली. तिने काही लोकांच्या मदतीने त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. परंतु तेथील डॉक्टारांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. बाबाराव याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. बाबाराव याने आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
आमलोन येथील आनंदराव मेश्राम या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच डोंगरगाव येथील शेतकऱ्याने विषाचा घोट घेऊन जगाचा निरोप घेतला. एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्याने झरी तालुका हादरला आहे. मागील ५ दिवसांत ३ जणांनी आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. झरी तालुक्यातील आत्महत्यांचं हे सत्र थांबता थांबत नसून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment