Latest News

Latest News
Loading...

वेकोलिच्या नियमबाह्य कामांना लागणार का हो चाप, वेकोलीमुळे नैसर्गिक आपत्ती ओढवण्याचा निर्माण झाला धोका, नदीचे पाणीही होऊ लागले दूषित

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळसाखाणीतील कोळशाची उत्पादन क्षमता वाढविण्याकरिता कोळसाखाणीत मोठ्या प्रमाणात उत्खनन कार्य सुरु आहे. भूगर्भात खोलवर असलेला कोळसा बाहेर काढण्याकरिता महाकाय मशीनने जमीन पोखरून भूगर्भाच्या तळाशी जाण्याचा वेकोलि कडून प्रयत्न केला जात आहे. नियमांना धाब्यावर बसवून जमिनीला सुरुंग लावण्याचे काम वेकोलि करतांना दिसत आहे. कोळशाचे उत्पादन वाढविण्याकरिता जमीन पोखरली जात असल्याने नैसर्गिक आपत्ती ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अज्रास्त्र मशीनने जमीन खोलवर पोखरून भूगर्भात पोकळी तयार करण्याचा वेकोलिचा प्रयत्न सुरु आहे. वेकोलिने जमिनीत शेकडो फूट खोल खड्डे तयार केले आहेत. त्यामुळे जमीन खिळखिळी झाली आहे. निसर्ग निर्मित रचनेची विकृती करून धोकादायक परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळे मानवी जीवनही धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 

भूगर्भात असलेली खनिज संपत्ती बाहेर काढण्याकरिता खोलवर जमीन पोखरून भूगर्भाची लक्तरे काढली जात आहे. वेकोलिने कोळसाखाणीत अतिशय खोलवर उत्खनन करून नियमबाह्य पद्धतीने डम्पिंग यार्ड तयार केले आहे. कोळसाखाणींच्या उत्खनातून निघणारी माती व मुरूमाचे कोळसाखान परिसरात ढिगारे तयार झाले आहेत. जमिनी पासून काही मीटर उंचीचेच ढिगारे करण्याचा नियम असतांना वेकोलिने नियमबाह्य पद्धतीने मातीच्या ढिगाऱ्यांचे डोंगर तयार केले आहे. त्यामुळे कोळसाखानीत नेहमी भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला असतो. हे मातीचे ढिगारे केंव्हा खचतिल याची शाश्वतीच राहिलेली नाही. त्यामुळे कोळसाखाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व कोळसाखान परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. 

वेकोलिच्या कोलारपिंपरी कोळसाखाणीचा डम्पिंग यार्ड अगदीच वर्धा नदीच्या पात्राजवळ असून या डम्पिंग यार्ड मधील मातीमुळे वर्धा नदी पात्रात गाळ तयार झाला आहे. मातीचा ढिगारा नदी पात्राकडे सरकू लागला असून नदीचे पात्र अरुंद होऊ लागले आहे. नदी पात्रात मातीचा गाळ तयार झाल्याने नदीचे पाणी गढूळ होऊ लागले आहे. याबाबत गावकऱ्यांनी वेकोलीशी अधिनस्त असलेल्या हिलटॉप कंपनीकडे लेखी तक्रारी करूनही हिलटॉप कंपनीचे व्यवस्थापक कुठलीही खबरदारी घेण्यास टाळाटाळ करतांना दिसत आहे. वेकोलिचे या कंपनीला पाठबळ असून वेकोलि कुणालाही जुमानत नसल्याचे वेकोलिने अनेकदा सिद्ध केले आहे. नियमांना धाब्यावर बसवून वेकोलि कोळसाखान परिसरात मनमानी कामे करीत आहे. शासन व प्रशासनाचा वेकोलि प्रशासनावर जराही वचक राहिलेला नाही. राज्यात सरकार व सरकार मधील पालकमंत्रीही जिल्ह्यातीलच रहिवाशी असतांना सत्ताधारी पक्षातीलच नेते मंडळी व लोकप्रतिनिधींना वेकोलि विरोधात दंड थोपटावे लागते, यापेक्षा मोठी शोकांतिका आणखी कोणती असू शकते. 

वेकोलिच्या बेबंदशाहीला आवर घालणे गरजेचे झाले आहे. वेकोलिने दुर्लक्षित धोरण अवलंबिले आहे. कोळसाखाणींमुळे उद्भणाऱ्या समस्यांशी त्यांना कुठलंच कर्तव्य उरलेलं नाही. कोळसाखाणींमुळे प्रदूषित वातावरणात जीवन जगणं तालुकावासीयांच्या नशिबी आलं आहे. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. हवा तर प्रदूषित झालीच आहे आता नद्यांचे पाणीही दूषित होऊ लागले आहे. वेकोलि प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे समस्यांचा डोंगर वाढू लागला आहे. कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देतांना नागरिक बेजार झाले आहेत. वेकोलि विरुद्ध सतत आंदोलनं केली जात आहेत. आंदोलनाची मालिका सुरु असतांना वेकोलि अधिकाऱ्यांवर या आंदोलनाचा विशेष प्रभाव पडतांना दिसत नाही. वेकोलिची कित्येक आश्वासने हवेत विरली आहेत. त्यामुळे मुर्दाड वेकोलि प्रशासनाला जागे करण्याकरिता तीव्र लढा उभारणार असल्याच्या प्रतिक्रिया आता गाव शहरातील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. 

No comments:

Powered by Blogger.