धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई देण्याकरिता शासन धोरण ठरवावे, माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या धूळ प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सतत उडणाऱ्या धुळीने शेत पिकांचं मोठं नुकसान होऊ लागलं आहे. धूळ प्रदूषणाने मुख्य मार्गालगत असलेल्या शेतपिकांची हानी होऊ लागल्याने कास्तकार चांगलाच संकटात आला आहे. धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई देण्याकरिता शासनाने धोरण ठरविणे अगत्याचे झाले आहे. तसेच प्रदूषणात भर घालणाऱ्या वेकोलिच्या कोळसा वाहतुकी करीताही नियम लावणे गरजेचे झाले आहे. धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई देण्याबाबत शासन धोरण ठरविण्याची मागणी भाजप नेते व माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर विभागाच्या माध्यमातून शेत जमिनी अधिग्रहित करतांना शेतकऱ्यांना अगदीच कवडी मोल भाव दिला जायचा. परंतु याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्याने शासनाने मे २०१२ रोजी आदेश काढून शेत जमिनीचा एकंदरीत दर निश्चित केला. वेकोलि कडून शेत जमीन अधिग्रहित करतांना कास्तकारांना योग्य मोबदला मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रती हेक्टर शेतीचा भाव ठरवून दिल्याने शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली. परंतु वेकोलि मात्र प्रदूषण नियंत्रणाकडे कमालीचे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. प्रदूषणाबाबत केलेले कायदे व नियमांचे वेकोलि कडून पालन केले जात नसल्याने प्रदूषणाने उचांक गाठला आहे. कोळसाखाणींमध्ये कोळशाचे उत्खनन, कोळशाची साठवणूक व सीएचपीमध्ये कोळसा खाली करतांना तसेच ट्रकांमध्ये कोळसा भरतांना व खाली करतांना मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडते. त्याचप्रमाणे कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळेही धूळ प्रदूषणात कमालीची भर पडली आहे.
कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व्यवस्थित ताडपत्री झाकली जात नसल्याने ट्रकांमधून मोठ्या प्रमाणात कोळसा रस्त्यावर पडतो. या कोळशावरून वाहने जाणे येणे करीत असल्याने या कोळशाची नंतर चुरी तयार होते, व ती धूळ बनून सतत रस्त्यावरून उडत असते. कोळसा वाहतुकीमुळे मुख्य मार्गांवर नेहमी काळं धुकं पसरलेलं दिसतं. कोळसा वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या धूळ प्रदूषणाने शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आहे. धूळ प्रदूषणाने मुख्य मार्गांवर असलेल्या शेतातील पिकं पूर्णतः उद्धवस्त झाली आहेत. तर काही शेतमालाची प्रतवारी या धुळीमुळे घटली आहे. धुळीमुळे काळवंडलेला कापूस वेचायला मजूर तयार होत नाही. कापसाची प्रतवारी घसरून कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे कास्तकार चांगलाच हवालदिल झाला आहे. वेकोलिच्या नियमबाह्य कोळसा वाहतुकीमुळे शेत पिकांचं होणारं नुकसान कास्तकारांच्या जिव्हारी लागताना दिसत आहे. धूळ प्रदूषणामुळे शेत जमिनीची सुपीकताही घटू लागली आहे. वेकोलिचं प्रदूषण नियंत्रणाकडे कमालीचं दुर्लक्ष होऊ लागलं असून वाढत्या प्रदूषणामुळे जनजीवन प्रभावित होऊ लागलं आहे. वेकोलिच्या कोळसाखानी व कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने शेतपिकांचं नुकसान व आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागल्याने वणी तालुक्यातील कास्तकार व रहिवाशांमधून वेकोलि प्रशासनाविषयी कमालीचा असंतोष खदखदत आहे. त्यामुळे वेकोलिच्या नियमबाह्य धोरणांना लगाम लावणे गरजेचे झाले आहे.
वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेत पिकांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीला घेऊन आंदोलनाची मालिकाच सुरु आहे. या आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने शेत पिकांचे पंचनामेही केले. पण धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई देण्याचे कुठलेच शासन धोरण नसल्याने पंचनाम्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळतांना दिसत नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात येते. यावेळी शेतकरी, शेत मजूर व प्रकल्पग्रस्त नागरिक आपापल्या व्यथा मांडतात. शेतकरी धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाई करीता आग्रही मागणी करतात. त्यावर जिल्हाधिकारी त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याबाबतचा अहवाल आल्यानंतर नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन देतात. परंतु प्रत्येक्षात धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई देण्याचे कुठलेही शासन धोरण नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारल्या जात आहे. त्यामुळे धूळ प्रदूषणाने शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत शासन धोरण ठरवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याकरिता वेकोलिला बंधनकारक करण्याची कडकडीची मागणी भाजप नेते विजय पिदूरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
Comments
Post a Comment