वणी तालुक्यातील कायर येथे भव्य निःशुल्क रोग निदान व उपचार शिबीर, सरपंच नागेश धनकसार तथा जनसेवा मित्र मंडळाचं आयोजन
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील कायर येथे निःशुल्क रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेद्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) तथा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ३ डिसेंबरला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश धनकसार व जनसेवा मित्र मंडळ कायर यांच्या सहकार्यातून हे भव्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात निःशुल्क व मोफत रोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, हायड्रोसिल शस्त्रक्रिया व हर्निया सारख्या गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून निःशुल्क करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते व भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष गजानन विधाते, सरपंच नागेश धनकसार, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया, डॉ. अमित शेंडे (ग्रामीण रुग्णालय कायर), तलाठी डोहे, जी.प. शाळा कायरचे मुख्याध्यापक मुस्तफा, उपसरपंच मायाताई मोहुर्ले (कायर), सरपंच संघटनेचे अध्यक्ष तुकाराम माथनकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी ग्रामपंचायतीचे सरपंच तात्याजी पावडे, सरपंच रंजना पिदूरकर (साखरा), सरपंच गणेश टेकाम (पुरड), सरपंच हेमंत गौरकार (खांदला), सरपंच अनुप बोबडे (चिलई), सरपंच मंगेश मोहुर्ले (घोन्सा), सरपंच सविता ढवस (मेंढोली), सरपंच कार्तिका कुचनकार (नेरड), सरपंच प्रवीण झाडे (पेटूर), सरपंच कल्पना टोंगे (येनक), सरपंच चंद्रभागा सहारे (तेजापूर), सरपंच मंगला टेकाम (ईजासन), सरपंच हेमलता बोढाले (वडजापूर), उपसरपंच भारती डाहुले (बाबापुर) हे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याची तपासणी व रोगनिदान करण्यात येणार आहे. गंभीर व दुर्धर आजारांवर निःशुल्क उपचार व शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. सर्वसामान्य व्यक्तींना आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या रोगांचे निदान लागत नाही. काहींना उपचाराचा खर्च उचलणं कठीण जाते, तर काही जण शास्त्रक्रियेअभावी जीवाला मुकतात. अशा या सर्व सामान्य व्यक्तींना आरोग्याच्या मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे भव्य रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराचे वैशिष्ट्ये म्हणजे शिबीर स्थळीच रुग्णांना नाव नोंदणी करता येणार आहे. रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येईल. रुग्ण भरती झाल्यानंतर त्यांच्या सर्व चाचण्या मोफत करण्यात येईल. भरती रुग्णांना बेड व जेवण सुद्धा मोफत राहील. सिटीस्कॅन, एमआरआय आदी अतिआवश्यक चाचण्या देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात येईल. रुग्णांचा आजार कुठल्याही शासकीय योजनेत येत असल्यास त्या योजनेला प्राधान्य देण्यात येईल. शिबिरात सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल. फाटलेले ओठ, दुभंगलेला टाळू (जांभाडा), तसेच जन्मतः असलेल्या मुखविकृतीवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे गुडघा व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे भरती करण्यात आलेल्या रुग्णांना रुग्णालयात जाण्याकरिता वाहनांची देखील मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. शिबिरात येणाऱ्या रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणणे गरजेचे आहे.
या आरोग्य शिबिराला मेडिसिन तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नाक, कान, घसा तज्ज्ञ, श्वसन रोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, कर्करोग तज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार आहे. शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व रोग निदान करण्यात येणार आहे. तसेच उपचार व शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहे. वणी उपविभागातील जनतेने या भव्य निःशुल्क रोग निदान व उपचार शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आव्हान आयोजक तथा कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश धनकसार तथा जनसेवा मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

No comments: