वणी विधानसभा क्षेत्रातील युवा वर्गाला रोजगार मिळवून देण्याचा ध्यास घेतलेल्या मनसेचा आज शहरात भव्य रोजगार महोत्सव
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवून जण कल्याणाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बेरोजगार युवकांचे हात बळकट करण्याकरिता त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा केलेला संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून आज ३ डिसेंबरला शहरात भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ (एसपीएम) महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात हा रोजगार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता पासून हा रोजगार महोत्सव सुरु होणार असून हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महारष्ट्रातील विविध नामांकित क्षेत्रात शैक्षणिक पात्रतेनुसार युवकांना रोजगार मिळवून देण्याची जबादारी मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी स्विकारली आहे. त्यामुळे बेरोजगार युवा युवतींना आपल्या आयुष्याचे नंदनवन करण्याची ही सुवर्ण संधी असणार आहे.
वणी विधासभा क्षेत्रात बेरोजगारीचा आलेख वाढतच चालला आहे. शैक्षणिक पात्रतेनंतरही हाताला काम नसल्याने युवावर्ग नैराशेच्या गर्तेत आला आहे. बेरोजगारीची समस्या ही अधिकाधिक जटिल होऊ लागली आहे. बेरोजगारी हा आज कळीचा मुद्दा बनला आहे. शहर व तालुक्यात बेरोजगारांच्या फौजा तयार होऊ लागल्या आहेत. युवावर्ग रोजगारासाठी वणवण भटकतांना दिसत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात मोठमोठे उद्योग व कंपन्या असतांनाही स्थानिकांना रोजगार मिळतांना दिसत नाही. मराठी युवकांची कंपन्यांना ऍलर्जी झाल्याचे दिसते. उद्योग व कंपन्यांमध्ये परप्रातीयांचा मोठ्या प्रमाणात भरणा दिसून येतो. येथील भूमीवर कंपन्या व उद्योग थाटण्यात आले, पण भूमी पुत्रांना मात्र रोजगार देण्यात नाकं मुरडली जातात. बेरोजगारीचं भयावह वास्तव अनुभवणाऱ्या राजू उंबरकर यांनी बेरोजगारी निर्मूलनाला हात घालण्याचे ठरविले. वणी उपविभागातील उद्योग, कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच नामांकित उद्योग व कंपन्यांमध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांनी निर्धार केला. त्या दिशेने पाऊल टाकत त्यांनी बेरोजगार युवा युवतींचे अर्ज मागविले. आणि आज ३ डिसेंबरला भव्य रोजगार महोत्सव आयोजित केला आहे. या रोजगार महोत्सवात ७० पेक्षा जास्त उद्योग व कंपन्यांचे व्यवस्थापकीय अधिकारी सहभागी होणार असून ते युवकांच्या थेट मुलाखती घेणार आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्रांची पडताळणी व मौखिक चाचणी नंतर युवक व युवतींना त्या त्या क्षेत्रात सरळ नोकरी मिळणार आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा बेरोजगारांनी लाभ घेऊन आपल्या आयुष्याचे सोने करून घ्यावे. बेरोजगारीची झळ सोसणाऱ्या माझ्या मराठी भाऊ बहिणींनी या रोजगार मेळाव्यातून रोजगार प्राप्त करून घेण्याचे आव्हान मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्याच्या उत्तम नियोजनाकरिता मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.


No comments: