प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील कायर येथे आयोजित भव्य रोगनिदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेद्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) तथा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश धनकसार व जनसेवा मित्र मंडळ कायर यांच्या पुढाकारातून हे भव्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात आरोग्य तपासणी, रोग निदान व उपचार अगदीच मोफत करण्यात आले. तसेच गंभीर व दुर्धर आजारावरील शस्त्रक्रियाही निःशुल्क करण्यात येणार असून रुग्णांना शस्त्रक्रियेकरिता सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आर्थिक परिस्थिमुळे गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना या आरोग्य शिबिरातून उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ मिळाल्याने रुग्णांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. गंभीर व दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च रुग्णालय व आयोजकांनी उचलल्याने आपण ठणठणीत बरे होणार असल्याचे समाधान यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यांवर झळकत होते.
या शिबिराच्या उदघाटन सोहळ्याला आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, दत्ता मेघे आयुर्विद्यान संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, म.प्र. किसान मोर्चाचे उपाध्यक्ष दिनकर पावडे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन विधाते, वैद्यकीय अधीक्षक अमित शेंडे (कायर), सरपंच नागेश धनकसार (कायर), जी.प. शाळा कायरचे मुख्याध्यापक मुस्तफा, तलाठी डोहे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष तुकाराम माथनकर, उपसरपंच मायाताई मोहुर्ले, सरपंच हेमंत गौरकार (खांदला), सरपंच तात्याजी पावडे, सरपंच रंजना पिदूरकर, सरपंच गणेश टेकाम, सरपंच अनुप बोबडे, सरपंच मंगेश मोहुर्ले, सरपंच सविता ढवस, सरपंच कार्तिका कुचनकार, सरपंच प्रविण झाडे, सरपंच कल्पना टोंगे, सरपंच चंद्रभागा सहारे, सरपंच मंगला टेकाम, सरपंच हेमलता बोढाले, उपसरपंच भारती डाहुले यांची उपस्थिती लाभली. सुदृढ आरोग्यासाठी आरोग्याची निगा राखणं गरजेचं असून आरोग्याची तपासणी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. रोग निदान झाल्यानंतर त्यावर उपचार व आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया करून घेणंही जरुरी असतं. पण सर्व सामान्य जनतेला आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयाचा खर्च उचलणं शक्य होत नसल्याने त्यांचे आजार आणखीच चिघळतात. योग्य उपचाराअभावी रुग्णांचं जीवन धोक्यात येतं. त्यामुळे रुग्णांना आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्याची गरज ओळखून सेवाभावी उपक्रमांतर्गत ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली जात आहेत. या शिबिरांचा सर्व सामान्य जनतेने नेहमी लाभ घ्यावा व शरीराला रोगमुक्त करून घ्यावे असे सूचक विधान यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
सरपंच नागेश धनकसार व जनसेवा मित्र मंडळ यांनी शिबिराचं अतिशय उत्तम नियोजन केलं. तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवक अशा एकूण १०० जणांची टीम या शिबिरात सेवा देण्याकरिता आली होती. प्रत्येक तज्ज्ञ डॉक्टरला आरोग्य तपासणी करीता शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये स्वतंत्र कक्ष देण्यात आला होता. तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच प्रत्येक रुग्णांची तपासणी करून रोग निदान करण्यात आले. रुग्णांवर मोफत उपचार व औषधांचे देखील वाटप करण्यात आले. गंभीर व दुर्धर आजार जडलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेकरिता सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. नेत्र रुग्णांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला. मोतिया बिंदू असलेल्या ३३७ रुग्णांना शस्त्रक्रियेकरिता पाठविण्यात आले असून त्यांच्यावर निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. महिलांनीही या शिबिराचा पुरेपूर लाभ घेतला. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या आजारांचे समाधान केले. एकूण १२०० रुग्णांनी या शिबिरातून आरोग्य तपासणी व उपचार करून घेतले. विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ११० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना आयोजकांनी स्वखर्चाने वाहनांची व्यवस्था करून रुग्णालयात पाठविले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाची जबादारी सरपंच नागेश धनकसार व जनसेवा मित्र मंडळाच्या कुंदन टोंगे, सुभाष पिटलवार, पिंटू गोहूकार, महेश गुरनुले, मुकेश जुनगरी, सोनल बोथले, साईनाथ बोरूले, रमेश गाऊत्रे, बालाजी गंधशिरवार, बाळकृष्ण पेंदोर, विठ्ठल जिनावार, सुरज शेंडे यांनी पार पाडली.



No comments: