मध्यरात्री तेलंगणा राज्यात होणारी गोवंश तस्करी एलसीबी पथकाने रोखली, आठ तस्करांना अटक व ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
अपराधीक घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मध्यरात्री मुकुटबन व मांगली मार्गे तेलंगणा राज्यात होणारी गोवंश तस्करी रोखली. गुन्हे शाखा पथकाने कत्तली करीता गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून तेलंगणा राज्यात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक व कळपाने जनावरे घेऊन जाणाऱ्या आठ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून १३ गोवंश जनावरे व १७ बैलांची सुटका करून एलसीबी पथकाने त्यांना जीवनदान दिले आहे. रासा येथिल गौरक्षण संस्थेत या सर्व जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आले आहे. या दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत गुन्हे शाखा पथकाने ३० गोवंश जनावरे व एक पिकअप वाहन असा एकूण ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही ३ डिसेंबरला मध्यरात्री करण्यात आली.
अवैध धंदे व संपत्ती विषयक गुन्हेगारांची माहिती मिळविण्याकरिता मुकुटबन परिसरात गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखा पथकाला मध्यरात्री एका पिकअप वाहनातून कत्तली करिता गोवंश जनावरांची वाहतूक होणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा पथकाने मुकुटबन ते येडशी मार्गावर सांगितलेल्या वर्णनाच्या वाहनाचा शोध घेतला असता त्यांना रस्त्याच्या कडेला एक पिकअप वाहन उभे दिसले. वाहनाजवळ चार इसम उभे होते. त्यांना पिकअप वाहनाने होत असलेल्या वाहतुकीबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी पिकअप वाहनाची झडती घेतली. त्यात चारापाण्याची व्यवस्था न करता अतिशय निर्दयीपणे कोंबलेली गोवंश जनावरे आढळून आली. गुन्हे शाखा पथकाने पिकअप वाहनासह (TS १० UB ८६८७) चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी तेलंगणा राज्यात कत्तली करिता जनावरे घेऊन जात असल्याची कबुली दिली. गुन्हे शाखा पथकाने या चारही आरोपींना अटक करून पुढील कार्यवाही करीता त्यांना मुकुटबन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एलसीबी पथकाने अटक केलेल्या आरोपींमध्ये फयाम गफ्फार शेख (३२) रा. वार्ड क्रं. ४ मुकुटबन, सद्दम उर्फ सय्यद शाकिब सय्यद महमूद (३२) रा. चिखलवर्धा ता. घाटंजी, संदीप निंबाजी सोयाम (४१) रा. पिंपरडवाडी ता. झरीजामणी, राजू निंबाजी सोयाम (२५) रा. पिंपरडवाडी ता. झरीजामणी यांचा समावेश असून त्यांच्या जवळून १३ गोवंश जनावरे व एक पिकअप वाहन असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दुसऱ्या कार्यवाहीत एलसीबी पथकाने कत्तली करीता बैलांचा कळप घेऊन जाणाऱ्या चार तस्करांना अटक केली आहे. मुकुटबन पोलिस स्टेशन मधिल कार्यवाही आटपून वणीकडे परत येतांना खडकी गणेशपूर गावातुन मांगली मार्गे काही इसम कत्तली करीता बैलांचा कळप घेऊन जात असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने मांगली चौपाटी येथे सापळा रचला असता त्यांना चार इसम तुतारीने बैलांना टोचून बैलांचा कळप घेऊन येतांना दिसले. एलसीबी पथकाने त्या चारही इसमांना थांबवून मध्यरात्री बैलांना कुठे घेऊन जात आहे, अशी विचारणा केली असता त्यांनी तेलंगणा राज्यातील बेला जि.आदिलाबाद येथे वास्तव्यास असलेल्या असलम कुरेशी व सलीम कुरेशी यांच्याकडे ही जनावरं पोहचवायला जात असल्याचे सांगितले. एलसीबी पथकाने तेलंगणा राज्यात कत्तली करीता बैलांची तस्करी करणाऱ्या चारही आरोपींना अटक केली. त्यांच्या तावडीतून १७ बैलांची सुटका करून त्यांना रासा येथील गौरक्षण संस्थेत सोडले. एलसीबी पथकाने अटक केलेल्या आरोपींमध्ये सचिन महादेव थेरे (३८), देविदास नानाजी भोसकर (४५), रमेश शालिकराव पेंदोर (४१), शत्रुघन नत्थू घोरपळे (४५) सर्व रा. टुंड्रा ता. वणी यांचा समावेश असून त्यांच्या जवळून पोलिसांनी १७ जनावरे व मोबाईल असा एकूण १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनाही पुढील कार्यवाही करीता मुकुटबन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्थागुशा पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोहवा योगेश डगवार, सुनिल खंडागळे, पोना सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, पोकॉ रजनीकांत मडावी, चापोना सतिश फुके यांनी केली. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.


No comments: