वेकोलिशी अधिनस्त असलेल्या हिलटॉप हायरोइन कंपनीतून बोगस डिझेलचा साठा जप्त, चार जनांवर गुन्हे दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
कोलारपिंपरी कोळसाखाणीत मोठ्या प्रमाणात उत्खनन कार्य सुरु असून उत्खननाचे कंत्राट हिलटॉप हायरोइन लिमिटेड या हेवीवेट कंपनीला देण्यात आले आहे. भूगर्भात खोलवर असलेला कोळसा बाहेर काढण्याकरिता या कंपनीशी वेकोलिने करार केला आहे. वेकोलीशी संलग्न असलेली ही कंपनी वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. या कंपनी बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. नियमबाह्य पद्धतीने या कंपनीने मोठं मोठे मातीचे ढिगारे तयार केले आहेत. अगदीच वर्धा नदीच्या पात्रालगत डम्पिंग यार्ड तयार करून मातीचे डोंगर उभे केले आहेत. हे मातीचे ढिगारे नदी पात्राकडे सरकू लागल्याने नदीचे पात्र अरुंद होऊन पाणी दूषित होऊ लागले आहे. याच मातीच्या ढिगाऱ्यांवर मातीसोबत येणारा कोळसाही खाली केला जात आहे. डम्पिंगचे अंतर वाचविण्याकरिता हिलटॉप कंपनी कडून नियमबाह्य पद्धतीने कामे केली जात आहे. कंपनीला वेकोलिचे पाठबळ असल्याने कंपनीचे अधिकारी नियमांचे सर्रास उल्लंघन करू लागले आहेत. हिलटॉप कंपनीच्या हिटलरशाहीमुळे कोलारपिंपरी गावातील जनता कमालीची त्रस्त झाली आहे.
हिलटॉप हायरोइन कंपनीत मातीची वाहतूक करणारे शेकडो ट्रक आहेत. हे ट्रक कोळसाखाणीच्या उत्खनातून निघणारी माती वाहून नेत डम्पिंग यार्डमध्ये खाली करतात. या ट्रकांच्या दुरुस्ती व देखभालीचे काम हिलटॉप कंपनीतच केल्या जाते. या कंपनीत परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणात भरणा असून स्थानिकांची संख्या अत्यल्प आहे. कंपनीत नियमबाह्य कामे होत असल्याची अनेक दिवसांपासून ओरड सुरु आहे. कंपनीत टँकरद्वारे येणारे डिझेल बोगस असल्याची कुजबुजही कंपनी मधून ऐकायला मिळत होती. हिलटॉप कंपनीतील व्होल्व्हो वाहनांमध्ये द्रव्य मिश्रित किंवा बायो डिझेल भरण्यात येत असल्याच्या चर्चांना उधाण आल्याने न्यूज मीडियातून याबाबत वृत्तही झळकले होते. त्यामुळे गुन्हे शाखा पथकाने याकडे लक्ष केंद्रित करून भेसळ डिझेलचा हा प्रकार उघडकीस आणला. गुन्हे शाखा पथकाने हिलटॉप कंपनीत टँकरद्वारे येणाऱ्या डिझेल बाबत संपूर्ण माहिती गोळा केली, व १८ डिसेंबरला पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना सोबत घेऊन या कंपनीत धाड टाकली. कंपनीत आढळून आलेल्या डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात बेसळ असल्याचे पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कंपनीत बोगस डिझेलचा मोठा साठा केला होता. कंपनीत आलेल्या डिझेल टँकरमध्येही द्रव्य मिश्रित डिझेल आढळून आले. टँकर चालकाकडे डिझेल वाहतुकीची कागदपत्रेही संशयास्पद आढळून आली. त्यामुळे गुन्हे शाखा पथकाने डिझेल टँकरसह (GJ १२ CT ७३१) कंपनीत साठवून ठेवलेला डिझेल साठा ताब्यात घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहे. हे बनावट डिझेल गुजरात येथून आणल्याचे चालकाने सांगितले. पोलिसांनी डिझेल टँकर चालक विजय रामजीत यादव (२७) रा. दोसपूर, उत्तर प्रदेश याला ताब्यात घेऊन त्याच्यासह ४ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून द्रव्य मिश्रित डिझेल किंमत २१ लाख रुपये, डिझेल टँकर किंमत १५ लाख रुपये असा एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास वणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
डिझेल टँकर मधून डिझेल विक्री करणे किंवा वाहनांमध्ये डिझेल भरणे नियमबाह्य असतांनाही पुरवठा निरीक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. शहरात सर्रास डिझेल टँकरने डिझल विक्री सुरु आहे. ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये डिझेल टँकरनेच ट्रकांमध्ये डिझेल भरण्यात येते. मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लावून डिझेल टँकर मधून डिझेल भरतांनाचे चित्र पहायला मिळते. कोळसाखाणींमध्येही डिझेल टँकर मधूनच ट्रकांमध्ये डिझेल भरण्यात येते. पण पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतांना दिसत आहे. पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांच्या नियमित कालखंडात बदल्या होत नसल्याने त्यांचे सर्वांशीच हित संबंध निर्माण होऊ लागले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment